Mumbai Epidemic Diseases : मुंबईत साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं, खबरदारी घ्या, भाजप आमदाराचं आयुक्तांना पत्र
Mumbai Epidemic Diseases : मुंबईत पावसाने नुकतीच विश्रांती घेतली असली तरी शहरात साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. यासाठी खबरदारी घेत योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असं आवाहन भाजप आमदार अमित साटम यांनी केलं आहे.
Mumbai Epidemic Diseases : जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह (Mumbai) राज्यभरात पावसाने हजेरी लावली. मुंबईत जुलैच्या सुरुवातीपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने नुकतीच विश्रांती घेतली असली तरी शहरात साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. यासाठी खबरदारी घेत योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असं आवाहन भाजपचे अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे आमदार अमित साटम (MLA Amit Satam) यांनी केलं आहे. त्यांनी याबाबत मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना पत्र लिहिलं असून केलेल्या कारवाईचा तपशील लेखी स्वरुपात कळवावा, असंही म्हटलं आहे.
अमित साटम यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "मुंबईत आठ दिवसांतच लेप्टोच्या रुग्णांची संख्येत काही प्रमाणात वाढली आहे. जुलैमध्ये लेप्टोचे 11 रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचाही प्रादुर्भाव कायम असून 33 रुग्णांचे निदान झाले आहे. मागील आठवडाभरात पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. परिणामी, लेप्टोचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरात 12 जुलैला लेप्टोच्या पाच रुग्णांची नोंद झाली होती. मागील आठवडाभरात यात आणखी सहा रुग्णांची भर पडली आहे. जूनमध्ये शहरात लेप्टोचे 12 रुग्ण आढळले होते. जुलैमध्ये पावसाचा जोर वाढल्याने 17 जुलैपर्यंतच 11 रुग्णांची नोंद झाली आहे.
डेंग्यूचाही प्रभाव कायम
शहरात डेंग्यूचा प्रसारही कायम असून जुलैमध्ये 33 रुग्ण आढळले आहेत. जूनमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 39 होती. हिवतापाचा प्रादुर्भावही सुरुच असून जुलैमध्ये 243 रुग्ण आढळले आहेत. जूनमध्ये 350 रुग्ण आढळले होते. डेंग्यूचा प्रादुर्भाव असला तरी जुलैमध्ये चिकनगुनियाचे मात्र शून्य रुग्ण नोंदले आहेत, असं अमित साटम यांनी पुढे म्हटलं आहे.
स्वाईन फ्लूचाही प्रादुर्भाव
पावसाळा सुरु होताच स्वाईन फ्लूनेही डोके वर काढले आहे. आठवडाभरात फ्लूच्या रुग्णांची संख्या 3 वरुन 11 वर गेली आहे. जानेवारी ते जुलैपर्यत राज्यात स्वाईन फ्लूचे 15 रुग्ण आढळले आहेत.
त्यामुळे आपण यासंदर्भांत योग्य त्या उपाययोजना कराव्यात आणि केलेल्या कारवाईचा तपशील लेखी स्वरुपात कळवावा, अशी सूचना साटम यांनी केली आहे.