भीमा कोरेगाव प्रकरणी चौकशी आयोगाचं शरद पवारांना बोलावणं
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात या आयोगाची सुनावणी होणार होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याऐवजी आता मुंबईत 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान आयोगाच्या सुनावणीचं कामकाज चालणार आहे.
मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयकडे सोपवला असला तरी चौकशी आयोगाचं कामकाज हे सुरूच आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना या आयोगानं चौकशीसाठी बोलावणं पाठवलं आहे. मुंबईत होणाऱ्या सुनावणी सत्रादरम्यान येत्या 4 एप्रिलला शरद पवारांना आयोगापुढे साक्ष देण्यासाठी हजर राहण्याचं समन्स जारी करण्यात आलं आहे. शरद पवारांची साक्ष घेण्याची मागणी करणारा अर्ज विवेक विचार मंचचे सदस्य सागर शिंदे यांनी आयोगाकडे केला होता. या घटनेनंतर शरद पवारांनी माध्यमांत केलेल्या काही वक्तव्यांवरून या घटनेसंदर्भात पवारांकडे काही अधिकची माहिती उपलब्ध असण्याची शक्यता असल्याचं या अर्जात म्हटलं होतं.
शरद पवार म्हणाले होते की, भीमा कोरेगाव प्रकरणी उसळलेल्या हिंसाचाराआधी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी तिथलं वातावरण बिघडवलं होतं. तसेच या प्रकरणी वस्तुस्थिती आणि पुणे पोलिसांचा तपास यात कमालीचा विरोधाभास आहे. त्यामुळे शरद पवारांची साक्षही चौकशी आयोगानं नोंदवली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल आणि सुमित मलिक यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाची चौकशी सध्या चौकशी सुरू आहे.
राज्यभारत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगाव दंगलीची चौकशी करणा-या आयोगाची पुण्यातील सुनावणी रद्द करत असल्याचं आयोगाच्यावतीनं मंगळवारी स्पष्ट केलं होतं. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात या आयोगाची सुनावणी होणार होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याऐवजी आता मुंबईत 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान आयोगाच्या सुनावणीचं कामकाज चालणार आहे.
1 जानेवारी 2018 मध्ये पुण्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेनं राज्यभरात दंगल उसळली होती. या दंगलीबाबत स्थानिक रहिवासी अनिता सावळे यांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यासह अन्य काही जणांविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फौजदारी फिर्याद नोंदविली गेली आहे.
Special Report | कोरेगाव-भीमाची समांतर चौकशी? | ABP Majha
संबंधित बातम्या :