(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझाच्या पाठपुराव्याला यश, मुंबई लोकलमधून खासगी आणि सहकारी बँकांतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा
निवडक 10 टक्के बँक कर्मचार्यांनी महाराष्ट्र राज्य सरकारकडून, स्टेशन प्रवेशासाठी, लवकरात लवकर क्यूआर कोड मिळवावा. तोपर्यंत वैध ओळखपत्रासह स्थानकांवर प्रवेश देण्यात येईल.
मुंबई : मुंबई लोकलमधून प्रवास करण्यास आता सहकारी आणि खासगी बँकांतील कर्मचाऱ्यांना देखील मुभा देण्यात आली आहे. एबीपी माझाने या कर्मचाऱ्यांच्या मागणीला न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांना देखील प्रवासाची मुभा द्यावी, असं पत्र रेल्वे बोर्डाला लिहिले. त्यानंतर रेल्वे बोर्डाने त्या मागणीला मंजुरी दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बँक कर्मचाऱ्यांना मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र यामध्ये सहकारी बँक कर्मचारी आणि खासगी बँकांतील कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर अन्याय का? असा प्रश्न विचारण्यात येत होता. याबाबत एबीपी माझाने बातमी करून सरकारला जाब विचारला होता. अखेर सरकारने या कर्मचाऱ्यांना देखील लोकल प्रवासाची मुभा देण्यास यावी, असे पत्र रेल्वे बोर्डाला लिहिले. त्यानंतर रेल्वे बोर्डाने याला मंजुरी दिली.
असे असले तरी प्रत्येक बँकेतील केवळ एकूण कर्मचाऱ्यांच्या 10 टक्के कर्मचाऱ्यांनाच हा प्रवास करता येईल. हे 10 टक्के कर्मचारी कोणते असतील ते बँकेने ठरवायचे असेल. या सर्व कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड बंधनकारक असेल. जोपर्यंत तो मिळत नाही तोपर्यंत बँकेचे आय कार्ड दाखवून त्यांना लोकल प्रवास करता येईल. 10 टक्के कर्मचाऱ्यांची आगळीवेगळी अट राज्य सरकारने ठेवल्याने काही बॅंक कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.