तळोजात कैद्यांना योग्य वैद्यकीय सेवा मिळत नाहीत, शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखांची तक्रार
वैद्यकीय उपचारांसाठी घरी नजरकैदेत ठेवण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका. राज्य सरकार आणि एनआयएला भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश.
मुंबई : नवी मुंबईतील तळोजा कारागृहात वयस्कर आणि आजारी कैद्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली जात नाही, त्यामुळे आजारपणात आपल्याला घरी नजरकैदेत ठेवा, अशी मागणी करत शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांनी हायकोर्टात याचिका केली आहे. याची दखल घेत हायकोर्टानं एनआयए आणि राज्य सरकारला याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
सत्तर वर्षीय प्राध्यापक गौतम नवलखा यांनी प्रकृती अस्वस्थ्याचं कारण जेल प्रशासनाला दिलं होत. मात्र, सतत छातीत दुखत असूनही कारागृह प्रशासन उपचार करत नाही, अशी तक्रार त्यांनी या याचिकेतून केली आहे. कारागृहात मुलभूत वैद्यकीय पायाभूत सुविधांची वानवा आहे, अपुरे मनुष्यबळ आणि ज्येष्ठ कैद्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणेचाही अभाव आहे. त्यामुळे इथं कैद्यांची प्रचंड गैरसोय होते असा आरोप या याचिकेतून केला आहे. प्रकृती, वाढतं वय आणि आजारपण या कारणांमुळे आरोपीला नजरकैदेत ठेवले जाऊ शकते या सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा आधार या याचिकेतून दिलेला आहे.
गुरूवारी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मार्च महिन्यापासून नवलखा यांना छातीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यावर उपचार होण्याची गरज आहे, त्यामुळे स्वखर्चावर त्यांना जसलोक रुग्णालयात हलविण्यात यावे अशी मागणी नवलखा यांच्यावतीने अॅड. युग चौधरी यांनी केली. मात्र, खाजगी रूग्णालयात नेण्याची गरज नाही, टाटा रुग्णालयातही त्यांच्यावर उपचार होऊ शकतात असं प्रमुख सरकारी वकील अरुणा पै यांनी हायकोर्टाला सांगितलं.
त्यावर याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्यांवर राज्य सरकार आणि एनआयएला हायकोर्टीनं नोटीस बजावत दोन आठवड्यात यावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, शुक्रवारी त्यांना टाटा रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात येईल, अशी माहिती राज्य सरकारकडून हायकोर्टाला देण्यात आली.