नवी मुंबईतील निवडणूका पुढे ढकलल्यानं उमेदवारांच्या तोंडाला फेस; प्रभागातील कार्यक्रमांना खर्च झाल्यानं उमेदवारांचे आर्थिक नुकसान
नवी मुंबई महानगर पालिका निवडणूक 2020 मधील एप्रिल महिन्यात होणार होती. यासाठीची पूर्ण तयारी महानगर पालिका प्रशासनाने करून 111 प्रभागाची आरक्षण सोडतही काढली होती. मात्र आचार संहिता लागणार तोच कोरोनाचा शिरकाव झाल्याने महानगर पालिका निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली.
नवी मुंबई : महानगर पालिकेच्या निवडणुका गेल्या दीड वर्षांपासून पुढे जावू लागल्याने इच्छूक उमेदवार हैराण झाले आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी प्रभागात गेल्या दोन वर्षांपासून कार्यक्रमापोटी पैसे टाकून आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात सहन करावे लागत आहे. परत एकदा कोरोनाची संख्या वाढू लागल्याने येत्या एप्रिल महिन्यात होणारी निवडणूक पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने उमेदवारांच्या तोंडाला फेस आला आहे.
नवी मुंबई महानगर पालिका निवडणूक 2020 मधील एप्रिल महिन्यात होणार होती. यासाठीची पूर्ण तयारी महानगर पालिका प्रशासनाने करून 111 प्रभागाची आरक्षण सोडतही काढली होती. मात्र आचार संहिता लागणार तोच कोरोनाचा शिरकाव झाल्याने महानगर पालिका निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. 2020 वर्ष कोरोनात गेले असून आता कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याने येत्या एप्रिल महिन्यात निवडणूक लागणार असल्याचे बोलले जात होते. मात्र परत एकदा मुंबई आणि आजूबाजूच्या शहरातील कोरोना संख्या वाढू लागल्याने निवडणुकीवर संक्रांत येण्याची शक्यता आहे. एकदा निवडणूक पुढे जाणार असण्याच्या शक्यतेने इच्छुक उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून निवडणूकीत जिंकण्यासाठी विविध कार्यक्रमापोटी प्रत्येक उमेदवारांनी लाखो रूपये खर्च केले आहेत. 2020 मधील एप्रिल महिन्यात होणाऱ्या निवडणूकीसाठी सहा महिने आधीपासून उमेदवारांनी कार्यक्रमाचा धडाका लावला होता. यामध्ये महिलांचे हळदीकुंकू, खेळ महोत्सव, पतंग महोत्सव, देवदर्शन सहली, निवडणूक जनसंपर्क कार्यालयाची सुरुवात आदींचा समावेश आहे. दुसरीकडे निवडणूक जिंकण्यासाठी प्रभागात आपला करिश्मा चालतोय का? प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या बाजूने किती मतदार आहेत? मतदारांना कोणते प्रश्न भेडसावत आहेत? आदींची घरनिहाय माहिती घेण्यासाठी खाजगी सर्वे करणाऱ्या संस्थांचा गेल्या दोन वर्षांपासून उरावर बसलेला खर्च.
लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंची गरज पडल्याने प्रभागातील नागरिकांना अन्नधान्य वाटणे, भाजीपाला पोचवणे, कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरोघरी मास्क, सॅनिटायझर वाटणे, सोसायट्यांच्या गेटवर सॅनिटायझर स्टॅंड देणे आदींचा भूर्दंड इच्छूक उमेदवारांच्या गळ्यात पडला होता. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक लढण्याआधीच राजकीय कार्यकर्त्यांचे 10 लाखांपासून ते 50 लाखांपर्यंत खर्च झाला आहे.
एकीकडे महाराष्ट्रामध्ये गेल्या महिन्यात जवळपास 15 हजार ग्रामपंचायत निवडणूका झाल्या. मग शहरातील महानगरपालिका निवडणूक का होत नाही? असा प्रश्न राजकीय पक्ष उपस्थितीत करू लागले आहेत. मनपा निवडणुकीच्या अनुशंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची दमछाक होत आहे. कोरोना नियम पाळून नवी मुंबई महानगर पालिका निवडणूक लवकरात लवकर घ्यावी अशी मागणी महाविकास आघाडी बरोबर भाजपा करू लागला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :