शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचं पथक दाखल
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात ईडीचं पथक दाखल झालं आहे, याशिवाय त्यांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीही ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत.
ठाणे : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात अंमलबजावणी संचालनालयाचं पथक पोहोचलं आहे. याशिवाय त्यांचे पूर्वेश आणि विंहग सरनाईक यांच्या घरीही ईडीचे अधिकारी सकाळी आठ वाजता दाखल झाले आहेत. एकूण दहा ठिकाणी मुंबई, ठाणे परिसरात शोध सुरु आहे. टॉप ग्रुपसंबंधी ही कारवाई करण्यात आली आहे. टॉप ग्रुपचे प्रमोटर्स आणि सदस्यांच्या घरी आणि कार्यालयात ही शोधमोहीम सुरु आहे. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत. महत्त्वाचं म्हणजे सरनाईक यांच्याव्यतिरिक्त शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगन रनौत प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी बाजू लावून धरली होती. त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्यासाठी, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी ही कारवाई होत असल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून प्रतिक्रिया देऊ, असं पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं आहे.
दिल्लीच्या टीमच्या नेतृत्त्वात ही कारवाई सुरु आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. यामुळे भाजपला सत्तेबाहेर राहावं लागलं. याचाच वचपा काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ईडीच्या माध्यमातून शिवसेना नेत्यांना लक्ष्य केलं जात असल्याची चर्चा रंगली आहे.
राजकारणासाठी अशा संस्थांचा वापर : बाळासाहेब थोरात प्रताप सरनाईक यांच्या घरात ईडीने शोधमोहीम सुरु केल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "अशा संस्थांचा वापर राजकारणासाठीच केला जातो," असा हल्लाबोल बाळासाहेब थोरात यांनी केला. "भाजपशासित राज्यातील नेत्यांवर अशी कारवाई झाल्याचं ऐकीवात नाही. परंतु भाजपच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांना त्रास होतो," असंही थोरात म्हणाले.
प्रताप सरनाईक यांची कोणकोणत्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका
- शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक हे ठाणे जिल्ह्यातील माजीवडा मतदारसंघातून सलग तीन टर्म आमदार आहेत. - मीरा-भाईंदर परिसराची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. - प्रताप सरनाईक सातत्याने भाजपविरोधात आक्रमक पद्धतीने बोलत असतात - कलर्स चॅनलच्या बिग बॉसमध्ये गायक कुमार सानू यांचा पुत्र जान सानूने मराठी भाषेविरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात प्रताप सरनाईक यांनी आक्षेप घेतला आहे. - रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणला होता. - मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत करणारी अभिनेत्री कंगना रनौतविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.