मुंबईतील नालेसफाईची माहिती आता मोबाईलवरच समजणार
मुंबई महापालिकेशी संबंधित विविध नागरी सेवा सुविधांविषयक माहिती नागरिकांना अधिक सुलभपणे करता यावी, यासाठी बीएमसीने हे अॅप तयार केले आहे. 'MCGM 24x7' हे अॅप एक लाखापेक्षा अधिक नागरिकांनी डाऊनलोड केले आहे.

मुंबई : मुंबईत कुठे किती नालेसफाई झाली हे आता मोबाईलवरच समजणार आहे. महापालिकेच्या 'MCGM 24x7' या अॅन्ड्रॉइड अॅपमध्ये नालेसफाई विषयक 'मॉड्यूल' विकसित करण्याचे महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी निर्देश दिले.
मुंबई महापालिकेद्वारे करण्यात येणाऱ्या नालेसफाई कामांमध्ये अधिक पारदर्शकता जपली जावी तसेच सदर कामे अधिक चांगल्या गुणवत्तेची व्हावीत, यासाठी महापालिकेच्या 'MCGM 24x7' या अॅन्ड्रॉइड अॅपमध्ये नालेसफाई विषयक 'मॉड्यूल' विकसित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
या मॉड्यूलमध्ये नालेसफाई करण्यापूर्वीची व झाल्यानंतरची छायाचित्रे तारीख व वेळेच्या उल्लेखासह 'अपलोड'करण्यात आली आहेत. ही छायाचित्रे आणि सदर ठिकाणची असणारी प्रत्यक्ष परिस्थिती यात मोठ्या प्रमाणात विसंगती आढळून आल्यास नागरिक त्यांच्या मोबाईलद्वारे सध्याचे छायाचित्र 'अपलोड' करुन ही विसंगती निदर्शनास आणू शकणार आहेत. तक्रारदारास त्यावर केलेल्या कारवाईची माहिती देणे, संबंधित अधिकारी वा कर्मचाऱ्यांना बंधनकारक असणार आहे.
मुंबई महापालिकेशी संबंधित विविध नागरी सेवा सुविधांविषयक माहिती नागरिकांना अधिक सुलभपणे करता यावी, यासाठी बीएमसीने हे अॅप तयार केले आहे. 'MCGM 24x7' हे अॅप एक लाखापेक्षा अधिक नागरिकांनी डाऊनलोड केले आहे. या अॅपमध्ये मुबंई महापालिका परिसरातील मोठ्या नाल्यांच्या 467 भागांची छायाचित्रे, तर छोट्या नाल्यांच्या 790 भागांची छायाचित्रे विभागनिहाय पद्धतीने देण्यात आली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
