(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई : चैत्यभूमी परिसरात गोंधळाचा प्रयत्न; परिस्थिती नियंत्रणात, तणावपूर्ण शांतता
Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din : चैत्यभूमीजवळ काहीवेळेसाठी प्रवेशाच्या मुद्यावरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलीस आणि भीमसैनिकांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
Chaityabhumi : मुंबईतील चैत्यभूमीवर काही वेळेसाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आलेल्या अनुयायांना पोलिसांनी रोखल्यानं काही अनुयायी संतापले. या अनुयायांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. मात्र, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण शांतता आहे. यावेळी सरकारकडून कोणतीही सुविधा पुरवण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी, शिवाजी पार्क येथे येत असतात. मात्र, मागील वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे सावट आहे. त्याशिवाय अनेकांनी घरातूनच अभिवादन करण्याचे ठरवले. राज्य सरकारचे आवाहन आणि कोरोनाचे सावट यामुळे चैत्यभूमीवर फार कमी गर्दी झाली होती. चैत्यभूमीवर काही अनुयायांना पोलिसांनी प्रवेश नाकारला. त्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला. चैत्यभूमीवरील बॅरिकेड ओलांडून एका गटाने चैत्यभूमीत शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर पोलीस आणि भीमसैनिकांनी गोंधळ घालणाऱ्यांना घटनास्थळावरून दूर केले.
या गोंधळानंतर रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी घडलेल्या गोंधळाच्या ठिकाणी भेट दिली. परिस्थिती नियंत्रणात असून संयम बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले. चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी काहीजण रांगेतून येण्याऐवजी थेट शिरण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती आनंदराज आंबेडकर यांनी दिली. पोलीस आणि कार्यकर्त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून कोणताही मोठा गोंधळ झाला नसून काळजी करण्याचे काही कारण नाही असेही त्यांनी सांगितले.
चैत्यभूमीवर यावेळी महापालिकेकडून कमी प्रमाणात सुविधा दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरवर्षी मुंबई महापालिकेकडून मोठ्या प्रमाणावर सुविधा दिली जाते. मात्र, यावेळी ती अपुरी असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- समीर वानखेडे चैत्यभूमीवर पहिल्यांदा दिसले, नमाजाला मात्र नियमित दिसायचे : नवाब मलिक
- Mahaparinirvan Din : थँक्स आंबेडकर! चैत्यभूमीवर महामानव डॉ बाबासाहेबांना दिग्गजांकडून अभिवादन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha