(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dombivli Manpada Police : 24 कोटींचा बनावट चेक वटवण्यास आले आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकले
Dombivli Manpada Police : देशभरात विविध ठिकाणी या टोळीने तब्बल 10 कोटींना गंडा घातलाय. या प्रकरणात आणखी किती जण सहभागी आहेत याचा मानपाडा पोलीस शोध घेत आहेत.
Dombivli Manpada Police : एका बड्या कंपनीच्या नावाने 24 कोटींचा बनावट चेक वटवण्यासाठी डोंबिवलीतील एका बँकेत आलेल्या तिघाना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. इतक्या मोठ्या रकमेचा बनावट चेक पाहून या मागे एखादं रॅकेट असल्याचा संशय पोलिसांना आला. चार महिने या रॅकेटच्या मागावर असलेल्या मानपाडा पोलिसांना अखेर यश आलंय. या रॅकेटमधील म्होरक्यासह आठ जणांना पोलीसानी बेड्या ठोकल्यात. हरिशचंद्र कडवे, नितीन शेलार, अशोक चौधरी, मजहर खान, उमर फारुख, सचिन साळसकर, अनेक ओतारी, भावेशकुमार ढोलकिया अशी या आठ जणांची नावे आहेत. भावेशकुमार हा या टोळीचा म्होरक्या होता, भावेश सचिनला बनावट चेक बनवण्यासाठी सांगायचा व सचिन हे चेक बनवून आपल्या साथीदाराच्या मदतीने हा चेक वटवायचा. देशभरात विविध ठिकाणी या टोळीने तब्बल 10 कोटींना गंडा घातलाय. या प्रकरणात आणखी किती जण सहभागी आहेत याचा मानपाडा पोलीस शोध घेत आहेत.
डोंबिवली पूर्व येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेत 1 ऑक्टोबर 2021 रोजी तीन जण आले. त्यामध्ये एकाने आपलं नाव हरीचंद्र कडवे असून मी संत रोहिदास सेवा संस्था वांगणी या संस्थेचा अध्यक्ष असल्याचे सांगितले. आमच्या संस्थेला इंडोस टॉवर लिमिटेड या मोबाईल टॉवर कंपनीकडून 24 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. असे सांगत हा चेक वटवण्यासाठी दिला. मोठ्या रकमेचा चेक असल्याने याबाबत बँक कर्मचाऱ्यांनी मॅनेजर विशाल व्यास यांना दिली. व्यास याना चेक पाहून संशय आला त्यांनी तत्काळ याबाबत यांनी मानपाडा पोलिसांना याची माहिती दिली. मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी श्रीकृष्ण गोरे यांच्या पथकाने घटना स्थळी धाव घेत तत्काळ हरिश चंद्र कडवे व त्याचे दोन साथीदार नितीन शेलार, अशोक चौधरी या तिघांना ताब्यात घेतले. 24 कोटीचा चेक आला होता तो चेक बनावटी होता. मात्र चेकवर जी स्वाक्षरी होती. ती हुबेहूब संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यासारखी होती.
चेक बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने या मागे मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी या तिघांची कसून चौकशी केली. या दरम्यान तिघे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय कराळे आणि पोलिस उपायुक्त सचीन गुंजाळ, वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शना खाली या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु झाला. या तपासात हरीशचंद्र याला हा चेक मजहार खान यांनी दिला होता. पोलिसांनी मजहर खान याला ताब्यात घेतल्यावर त्याने अनेक ओतारी याने चेक दिल्याचे सांगितले. पोलिसांनी अनेकला ताब्यात घेतलं. अनेकने हा चेक त्याला फारुक उमरने दिल्याचे सांगितले. पोलिसांनी फारुक उमर ताब्यात घेतलं. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने चेक सचिन साळसकर याने दिल्याचे सांगितले. वाढती यादी पाहून पोलीसही चक्रावले होते.
पोलिसांनी विरारवरुन सचिन साळसकर याला ताब्यात घेतलं, त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने भावेश ढोलकिया याने चेक तयार करण्यास सांगितल्याची माहिती दिली. गोरे यांच्या पथकाने या टोळीच्या आठही जणांना समोरासमोर बसवून सखोल चौकशी केली. गुजरात येथे राहणारा व इस्टेट एजंट असलेला भावेश ढोलकिया हा या सर्व प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे. काही महिन्यापूर्वी त्याची सचिन साळसकर याच्याशी भेट झाली. सचिन साळसकर हा कम्प्युटर मॅकेनिक आहे विविध सॉफ्टवेअर बनवण्यात तो निष्णात आहे. तो कोणत्याही कंपनीचा बनावटी चेक ढोलकिया याच्या सांगण्यावर तयार करीत होता. हे चेक वटवण्यासाठी विविध लोकांना शोधून त्यांच्याकडून हे चेक वतवले जात होते. या प्रकरनाचा मास्टरमाईंड भावेश हा अशाच एका प्रकरणात गुजरातच्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहे . या बाबत डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त जे. डी. मोरे यांनी अशा प्रकारे या टोळीने तामिळनाडू, गुजरात यासह अन्य राज्यातही 10 कोटीचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे. या प्रकरणात आणखीन कोण सहभागी आहे याचा शोध सुरु आहे.