एक्स्प्लोर
डोंबिवली हे माझ्या पाहण्यातलं घाणेरडं शहर : नितीन गडकरी
डोंबिवली हे माझ्या पाहण्यातलं घाणेरडं शहर असून अरुंद रस्ते, घाण, अनधिकृत बांधकामं यांना लोकप्रतिनिधींचाच आशीर्वाद आहे, असं नितीन गडकरी म्हणाले.
डोंबिवली : विकासाच्या मुद्द्यावरुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वपक्षियांचेच कान उपटले. डोंबिवली हे माझ्या पाहण्यातलं घाणेरडं शहर असून अरुंद रस्ते, घाण, अनधिकृत बांधकामं यांना लोकप्रतिनिधींचाच आशीर्वाद आहे, असं नितीन गडकरी म्हणाले.
डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थान आणि नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने विद्यार्थ्यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद आयोजित करण्यात आला होता.
या संवादात डोंबिवली शहर मुंबईच्या जवळ असतानाही शहराचा म्हणावा तसा विकास का होत नाही? आणि अनेक महत्त्वाचे प्रकल्प येऊ घातलेले असतानाही ते मार्गी का लागत नाहीत? असा प्रश्न एका विद्यार्थिनीने गडकरींना विचारला. यावर बोलताना गडकरी यांनी सुरुवातीलाच डोंबिवली हे माझ्या पाहण्यातलं एक घाणेरडं शहर आहे, असं विधान केलं.
दरम्यान, डोंबिवलीतली लोकं इतकी चांगली आहेत, मात्र अरुंद रस्ते, घाण, अनधिकृत बांधकामं यामुळे शहर घाण असल्याचं म्हणत या सगळ्याला स्थानिक लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद असल्याचा आरोप गडकरींनी केला. शिवाय जे लोकप्रतिनिधी शहराचा योग्य विकास करू शकत नाहीत, त्यांना निवडून का देता? असा सवाल करत यात लोकांचीच चूक असल्याचं गडकरी म्हणाले.
''रस्ता रुंदीकरणात अनेकांच्या मालमत्तांवर बुलडोझर फिरत असल्याने अनेकदा हितसंबंध दुखावले जातात, मात्र ते विकासासाठी आवश्यक असून मी नागपुरात रस्ता रुंद करण्यासाठी माझ्या सासऱ्यांचं घर पाडलं होतं, त्यानंतर मलाही घरात बायकोची नाराजी सोसावी लागली होती,'' असं गडकरी म्हणाले.
गडकरींच्या या पावित्र्याने डोंबिवलीत मात्र खळबळ माजली. कारण, कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. शिवाय डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण हे सध्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री आहेत. त्यामुळे कामं न करणाऱ्यांना आपल्या स्पष्ट वक्तेपणाने गडकरींनी फैलावर घेतल्याची चर्चा एकीकडे सुरू आहे, तर दुसरीकडे डोंबिवलीला घाणेरडं शहर म्हटल्याने डोंबिवलीकरांचा स्वाभिमानही दुखावला गेला आहे. यात लोकांची चूक नसून गडकरींनी स्वपक्षीय लोकप्रतिनिधींना काम करण्याचे धडे द्यावेत, अशी प्रतिक्रिया डोंबिवलीकरांनी दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement