धाड टाकण्यासाठी आलेल्या एनसीबीच्या अधिकार्यांवर सोडले कुत्रे! 19 वर्षीय ड्रग्ज पेडलरला अटक
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) टीमने अयान सिन्हाच्या घरी धाड टाकली. मात्र त्यावेळी त्याने त्याच्याजवळ पाळलेले दोन कुत्रे एनसीबी अधिकाऱ्यांच्या अंगावर सोडले

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईमधून 19 वर्षीय अयान सिन्हाला अटक केली आहे. अयान मुंबईतील वांद्रे, वर्सोवा, अंधेरी परिसरात ड्रग्स सप्लाय करत होता. याची माहिती मिळताच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या टीमने अयान सिन्हाच्या घरी धाड टाकली. मात्र त्यावेळी त्याने त्याच्याजवळ पाळलेले दोन कुत्रे एनसीबी अधिकाऱ्यांच्या अंगावर सोडले आणि त्यांना कारवाई करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला मात्र एनसीबी अधिकाऱ्याने कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं आहे.
कॉम्प्युटरच्या सीपीयूमध्ये लपवला गांजा
कुत्रे एनसीबी अधिकाऱ्यांवर सोडून एनसीबी अधिकार्यांना रोखण्याचा आणि तिथून पळ काढण्याचा अयानचा मानस होता. मात्र अयानला त्यात काही यश आलं नाही. या कारवाईमध्ये एनसीबी अधिकाऱ्याने अयानकडून गांजा जप्त केला आहे. जो त्याने त्याच्या कॉम्प्युटरच्या सीपीयूमध्ये लपवला होता. तसेच 2 लाख 30 हजार रुपयांची रोकडही जप्त केली. तसेच एनसीबी अधिकाऱ्यांनी अयानकडून कॉम्प्युटर, मोबाईल, इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि ड्रग्स वजन करण्यासाठी वापरण्यात येणारा वजन काटा ही जप्त केला आहे.
लॉकडाऊनमुळे बनला ड्रग पेडलर
गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता. त्यामुळे देशभरामध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र या लॉकडाऊनमुळे काही लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. काही लोकांच्या नोकर्या गेल्या. या सर्व परिस्थिती अयानसमोर सुद्धा उभ्या राहिल्या आणि या परिस्थितीवर तोडगा म्हणून अयान सिन्हाने ड्रग सप्लाय करण्याचं काम सुरू केलं. कमी वेळेमध्ये जास्त पैसे मिळू लागल्यामुळे अयानला ड्रग्स सप्लायची चटक लागली आणि तो यामध्ये अजून सक्रिय झाला.
पाहता-पाहता अयानचा प्रस्थ वाढत गेलं आणि अंधेरी वर्सोवा खार वांद्रे या परिसरामध्ये अयान ड्रग्ज सप्लाय करू लागला. अयानकडून ड्रग्स घेणाऱ्यांच्या यादीमध्ये काही सेलिब्रिटींची सुद्धा नावं आहेत. ज्याचा तपास आता एनसीबीकडून केला जात आहे. अयान हा एकटाच ड्रग्स सप्लायचा सूत्रधार नसावा. यामागे एक साखळी कार्यरत असल्याचा संशय एनसीबीला आहे, याचा छडा लावण्यासाठी आता एनसीबी सक्रिय झाली असून अयानच्या माहितीच्या आधारावर मुंबईमध्ये विविध ठिकाणी कारवाया करण्यात येणार आहेत. तसंच अयानच्या चौकशीतून जी नाव समोर येतील त्यांना सुद्धा चौकशीसाठी बोलवलं जाण्याची शक्यता आहे.तर दुसरीकडे अयानकडून कोणते सेलिब्रिटी ड्रग्स घेत होते त्यांची सुद्धा चौकशी एनसीबी कडून केली जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये एनसीबी कार्यालयामध्ये पुन्हा एकदा सेलिब्रिटींची रांग लागते का हे पाहणे हा महत्त्वाच असणार आहे.























