जागावाटपाची बोलणी होईपर्यंत शिवसेनेविरोधात बोलू नका, भाजप पक्षश्रेष्ठींचे आदेश
छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकांत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकांतील पराभवानंतर सावध भूमिका घेत भाजपनं एक पाऊल मागे घेतलं आहे.
मुंबई : आगामी निवडणुकीसाठी युतीच्या जागा वाटपाची बोलणी होईपर्यंत शिवसेनेविरोधात वक्तव्य न करण्याचा आदेश भाजप श्रेष्ठींनी दिला आहे. विश्वसनीय सूत्रांनी 'एबीपी माझा'ला ही माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे किंवा 'सामना'तून कितीही टीका झाली तरी त्याला उत्तर देऊ नका, संयम बाळगा, असा आदेश राज्यातील भाजप नेत्यांना देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेच्या टीकेला प्रत्युत्तर देणे टाळलं होतं. योग्य वेळ आल्यावरच उत्तर देऊ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे शिवसेनेनं कितीही आक्रमकपणे टीका केली, तरी राज्यातील भाजपच्या नेत्यांना पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे गप्प बसण्याशिवाय पर्याय उरला नाही.
नुकत्याच पार पडलेल्या छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकांत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकांतील पराभवानंतर भाजपनं सावध भूमिका घेत एक पाऊल मागे घेतल्याचं बोललं जात आहे.
पंढरपुरात उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
उद्धव ठाकरेंनी अयोध्येत जाऊन भाजप नेतृत्वाला कुंभकर्ण म्हणून हिणवलं. तर पंढरपुरातील आपल्या भाषणातही भाजपल लक्ष्य केलं. राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या झळांनी होरपळत आहे, असं असताना सगळे निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. मात्र शिवसेना शेतकरी आणि दुष्काळासाठी काम करत आहे. जागावाटप खड्ड्यात गेलं, आधी शेतकऱ्यांचं बघा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. दुष्काळ, राम मंदिर, कांदा प्रश्न, राफेल घोटाळा, पीकविमासह अनेक मुद्द्यांवरून सरकारवर जोरदार फटकारे ओढले. जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत असतात तिथे राष्ट्रीय पक्षाला धूळ चारली आहे, असे सांगत त्यांनी भाजपला पुन्हा एकदा इशारा दिला आहे.
संबंधित बातम्या
योग्य वेळी, योग्य उत्तर देऊ; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
जागावाटप गेलं खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचं बघा : उद्धव ठाकरेंचं सरकारवर शरसंधान