Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंनी माझा भाषण नीट ऐकलं नाही किंवा त्यांना समजलेलं नाही!
मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगला आहे. पहिल्यांदा फडणवीसांनी केलेल्या टीकेनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. आता पुन्हा फडणवीस यांनी पलटवार केला आहे.
Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून यापूर्वीच रणशिंग फुंकले आहे. आज मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या सत्कार कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला होता. यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही जोरदार पलटवार करत घणाघात केला. फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची कबूली दिल्याचा पलटवार उद्धव ठाकरे यांनी केला.
आता पुन्हा एकदा फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंनी माझा भाषण नीट ऐकलं नाही किंवा त्यांना समजलेलं नाही असे म्हटले आहे. मी एवढंच सांगितलं की बाळासाहेबांनी मुंबईसाठी जे स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न त्यांच्याच लोकांनी चुरचूर केला आहे, पायदळी तुडवल आहे. ते फक्त भ्रष्टाचारामध्ये गुंतून राहिले आणि स्वप्न पूर्ण करू शकले नाही.
बाळासाहेबांचे मुंबईसाठीचे ते स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत
जर त्यांनी माझा भाषा नीट ऐकलं असतं, तर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिलीच नसती. मुंबईमध्ये मोदींवर विश्वास ठेवून लोकांनी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून दिलं आहे. मोदीजींचे फोटो लावून तुम्ही निवडून आला आहात कशाला हे विसरता? जे काय उद्धव ठाकरे म्हणाले असतील आता जनताच त्याचा उत्तर देईल. दरम्यान, उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार आहे याबाबत विचारले असता त्यांनी त्याचे स्वागत असल्याचे म्हटले आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत भाषण करताना आपल्याला बाळासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेत सत्ता मिळवायची आहे म्हणत बाळासाहेबांच्या नावाने मते मागायचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता मोदींच्या नावाने मते मागून उपयोग होणार नाही हेच एकप्रकारे अधोरेखित केले, मोदी पर्व संपल्याचीच ही नांदी आणि कबूली आहे.
भाजपच्या धोरणानुसार वापर संपला की नवीन नाव शोधायचे आणि त्यांच्या नावाने मते मागायची आणि आपली सत्तेची तळी भरायची असाच हा प्रकार या निमित्ताने भाजपचा खरा चेहरा देवेंद्र यांनी समोर आणला. महाराष्ट्रातील जनता यांना मतपेटीतून याचे उत्तर देईल, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
फडणवीस यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बोलताना म्हणाले की, तुम्ही सर्वांनी कालची मुंबई पाहिली का? तीच संस्कृती, तोच उत्साह, तोच जल्लोष, तीच परंपरा... पुन्हा एकदा आपलं सरकार आल्यानंतर काय घडतं, हे आपण सर्वांनी पाहिलं. दहीहंडी जोरात साजरी झाली. पुढील सणही जोरात साजरे करायचे आहेत. आताचे मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत, असे म्हणत त्यांनी ठाकरे यांना टोला लगावला होता.