प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक व सुशासन आधारित 'विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंट' तयार करा : देवेंद्र फडणवीस
20247 पर्यंतची उद्दिष्टे निश्चित करून त्यानुसार राज्याची ध्येयधोरणे आखणारे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंट'संदर्भात बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिजन डॉक्युमेंटसंदर्भात महत्त्वाचे निर्देश दिले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित होते.
नीती आयोगाने 'विकसित भारत 2047'चा आराखडा तयार केला आहे. यानुसार महाराष्ट्र राज्यानेही व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे अशा सूचना आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार राज्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येत असून त्याचे प्रारुप कसे असावे, त्यामध्ये काय समाविष्ट करावे याबद्दल या बैठकीमध्ये चर्चा झाली. या व्हिजन डॉक्युमेंटचा पहिला प्रारुप आराखडा 15 ऑगस्टपर्यंत केंद्र शासनाकडे सादर करायचा असून अंतिम आराखडा हा 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत सादर करावयाचा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक व सुशासन यावर आधारित राज्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे. तसेच हा आराखडा उपयोगात आणता येईल आणि अंमलात आणण्याजोगा असावा. व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या ज्ञानानुसार योगदान दिल्यास हे उत्कृष्ट डॉक्युमेंट तयार होईल. त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, व्हिजन डॉक्युमेंटसंदर्भात नागरिकांची मते जाणून घ्यावी. यासाठी व्हॉट्सॲप चॅट बॉट, ऑनलाईन सर्व्हे आदी माध्यमांचा उपयोग करावा. तसेच व्हिजन डॉक्युमेंटचा लोगो तयार करण्यासाठी नागरिकांसाठी स्पर्धा ठेवावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
यावेळी 'विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंट' तयार करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रतिनिधींनी सादरीकरण केले.या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मुख्य सचिव यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते.
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली 'विकसित महाराष्ट्र २०४७ व्हिजन डॉक्युमेंट'बाबत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत सादरीकरण झाले. यावेळी उपमुख्यमंत्री @mieknathshinde, मुख्य सचिव @ssaunik यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. pic.twitter.com/Pit7IfMrVt
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 14, 2025
इतर बातम्या :























