Deepak Kesarkar On Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांसारख्या नेत्याने बोलताना भान ठेवलं पाहिजे, दीपक केसरकर यांचा सल्ला
Deepak Kesarkar On Chandrakant Patil : राजकारणात स्थान टिकवायचं असेल तर संयमाने बोलावं लागतं, असा सल्ला दीपक केसरकर यांनी चंद्रकांत पाटील यांना दिला आहे.
Deepak Kesarkar On Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांसारख्या (Chandrakant Patil ) ज्येष्ठ नेत्याने बोलताना 100 टक्के भान ठेवलं पाहिजे, असा सल्ला शिवसेनेचे नेते (शिंदे गट) दीपक केसरकर यांनी दिला आहे. बाबरी मशिद विद्ध्वंसावरुन (Babri Masjid Demolition) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी चंद्रकांत पाटील यांना खडे बोल सुनावले आहेत. "राजकारणात स्थान टिकवायचं असेल तर संयमाने बोलावं लागतं," असंही केसरकर म्हणाले. चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल मुख्यमंत्री आणि अमित शाहांनी आधीच नाराजी देखील व्यक्त केली आहे. त्यांनी त्यांचे कान टोचले आहेत. यापुढे बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही, असं केसरकर म्हणाले.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी एका टीव्ही मुलाखतीत केलं होतं. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशीद बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने पाडली तेव्हा शिवसेनेचा एकही कार्यकर्ता घटनास्थळी उपस्थित नव्हता. "मला अयोध्येतील कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने तीन-चार महिने तिथे ठेवले होते. यात सहभाग घेतलेले लोक बजरंग दल, विहिंप (विश्व हिंदू परिषद) किंवा दुर्गा वाहिनीचे होते," असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
टीकेनंतर चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मी अशा अर्थाने बोललो नसल्याचं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. "हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मुंबईतील हिंदू जिवंत राहिला. माझ्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात कधीही अनादर नव्हता. बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुंसाठी काम केलं आहे. त्यांच्याबाबतीत माझ्या मनात कधीही अश्रद्धा नव्हती. बाळासाहेबांचा अपमान करणं किंवा त्याचं महत्व कमी करण्यासारखं माझ्या मनातही कधी येणार नाही. यापूर्वी अनेक वेळा बाळासाहेबांचं नाव मी आदरानेच घेतलं आहे आणि ऋणही व्यक्त केलं आहे," असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
दीपक केसरकर यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
दुसरीकडे दीपक केसरकर यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, "बाळासाहेबांच्या नावावर आम्ही तुम्हाला देखील प्रेम दिलं. तुम्ही विचार सोडला तेव्हा आम्ही तुम्हाला सोडलं, असं केसरकर म्हणाले. माझ्या जिल्ह्यातले 400 कोटी रुपये त्यांनी परत घेतले. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला तुम्ही काय न्याय दिला? तुमचं पंतप्रधानांशी काय बोलणं झालंय? किती चांगल्याने त्यांनी तुम्हाला वागवलं? असे थेट प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारले आहेत.
ज्येष्ठ शिवसैनिकांना कधीही उद्धव ठाकरे भेटले नाहीत, मोदी साहेबांवर कायम टीका करता. मातोश्रीचा मान देखील तुम्ही संपवला आहे. सहानुभूतीची लाट निर्माण करणं आणि कार्यकर्त्यांना सोबत ठेवायचं एवढंच काम यांच्याकडे राहिलं आहे, असा थेट हल्लाबोल त्यांनी उद्धव ठाकरेंवर केला.