वाढीव वीज बिलाबाबत सोमवारपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा राज्यात उग्र आंदोलन करु : मनसे
वाढीव वीज बिलावरुन मनसेने राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. वीज बिलाबाबत सोमवारपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा राज्यात उग्र आंदोलन करु, असा इशारा मनसेने दिला आहे.

मुंबई : वाढीव वीज बिलाबाबत सोमवारपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा राज्यात उग्र आंदोलन करु, असं अल्टिमेटम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. "वाढीव वीज बिलात सवलत दिली जाईल असं सरकारनेच जाहीर केलं होतं. परंतु दिलासा देण्यास सरकारने नकार दिला आहे. ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे. सरकारने दिलेला शब्द पाळावा," असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बाळा नांदगावकर म्हणाले की, "राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी 100 युनिटपर्यंत सवलत देऊ असं जाहीर केलं होतं. वाढीव वीज बिलाचा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा मनसेच्या शिष्टमंडळाने सर्वात आधी ऊर्जामंत्र्यांची भेट घेतली होती. बेस्टच्या अधिकाऱ्यांनाही शिष्टमंडळ भेटलं. अदानी ग्रुप, रिलायन्स आणि बेस्टचे अधिकारी राज ठाकरेंना येऊन भेटले. राज्य सरकार म्हणून जबाबदारी होती की शब्द पाळायला होता. शेवटचा पर्याय म्हणून राज ठाकरे आणि मनसेचं शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटलं. राज्यपालांनी शरद पवारांशी बोलण्याचा सल्ला दिला. यांनतर राज ठाकरे शरद पवारांशी बोलले. त्यानंतर पवारांनी राज ठाकरेंना निवेदन पाठवण्यास सांगितलं. त्यानुसार राज ठाकरेंनी विविध कंपन्यांच्या नावाची निवेदनं पाठवली. अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही. आता कोणतीही सूट देऊ शकणार नाही, असं ऊर्जामंत्र्यानी जाहीर केलं. ही महाराष्ट्राच्या साडेअकरा कोटी जनतेची फसवणूक आहे, विश्वासघात आहे. श्रेयवादाच्या लढाईमुळे महाराष्ट्राच्या जनतेने का भोगायचं. म्हणून आम्ही अल्टिमेटम देतोय की सोमवारपर्यंत निर्णय घेतला नाही तर मनसे जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढेलच, तसंच उग्र आंदोलनही करु."
'वीज कापायला आले तर मनसैनिक तुमच्यासोबत' "महाराष्ट्रातील जनतेने या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही करत आहोत. वीज मंडळाचे लोक वीज कापण्यासाठी आले तर मनसैनिक तुमच्यासोबत असतील. यावेळी काही अनुचित घडलं तर याची जबाबदारी सरकारची असेल. सर्वसामान्यांची वीज कापणार असाल तर तुमचं वीज कनेक्शनही कापल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सोमवारपर्यंत वाट पाहा अन्यथा आपापल्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चे काढा," असं बाळा नांदगावकर म्हणाले.
सरकारमध्ये शरद पवारांच्याही शब्दाला किंमत नाही असं वाटतं : नांदगावकर आम्हाला शरद पवारांवर विश्वास आहे. परंतु शरद पवारांच्या शब्दालाही राज्य सरकारमध्ये किंमत उरलेली नाही, असं आम्हाला वाटतं. तुमचं आणि राज ठाकरे यांचं बोलणं झालं आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या सरकारचे सर्वेसर्वा म्हणून तुम्ही आदेश द्या आणि महाविकास आघाडी सरकार वाढीव वीज बिल माफ करत आहे, असं जाहीर करा. अन्यथा लोकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही, असंही बाळा नांदगावकर यांनी जाहीर केलं.
संबंधित बातम्या
'निवेदन, अर्ज, विनवण्या सगळं झालं, आता रस्त्यावर संघर्ष'; वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
























