लॉकडाऊनमुळे कल्याण डोंबिवलीत दुसरी आत्महत्या, कर्जबाजारी झालेल्या तरुणाने गळफास घेत संपवली जीवनयात्रा
लॉकडाऊनमुळे कल्याण डोंबिवलीत दुसरी आत्महत्या झाल्याची घटना समोर आली आहे. कर्जबाजारी झालेल्या तरुणाने गळफास घेत जीवनयात्रा संपवली आहे.
कल्याण : लोकडाऊनमध्ये व्यवसाय ठप्प झाल्याने निराश झालेल्या व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची कल्याण पूर्वेतील घटना ताजी असतानाच डोंबिवली पूर्व येथे देखील अशीच एक घटना उजेडात आलीये. लॉकडाऊनमध्ये व्यवसाय थांबला, नोकरीसाठी हातपाय मारले. मात्र, ते सर्वच प्रयत्न अपयशी ठरले, थकलेलं घराचं भाडं, लाईटबिल आणि त्यात डोक्यावर कर्जाचा बोजा. या सर्वांपेक्षा अधिक बोचणारी गोष्ट ही की हातात कोणतेच काम नसल्याने आलेला मानसिक दबाव. या सर्वांतून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग न सापडल्याने अखेर डोंबिवलीतील तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.
त्याच्या जाण्याने पत्नी आणि दोन लहान मुलांचे भवितव्य मात्र आणखी काळवंडले. लॉकडाऊनमुळे अनेक व्यापारी, नोकरदार हताश झाले असून आता तरी सरकार त्यांच्याकडे लक्ष देतील का? असा सवाल उपस्थित झालाय.
कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली असून अनेकांनी या दिवसात जगण्यासाठी उसनवारी घेत कर्ज काढत जगण्याचा प्रयत्न केला. मात्र, दीड वर्ष उलटले तरी अद्याप कोरोनाच्या दुष्टचक्रातून सुटका होऊ शकलेली नाही. डोंबिवली पूर्वेकडील दावडी येथील साई गॅलक्सी या इमारतीमध्ये सुरज सोनी पत्नी व दोन मुलांसह राहत होता. डोंबिवली स्टेशन परिसरात मोबाईल रिपेरिंग खरेदी विक्री करत त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.
सगळं काही सुरळीत होतं. मात्र, त्यातच कोरोना आणि त्यापाठोपाठ लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊन काळात सुरजच्या व्यवसायावरही गदा आली. व्यवसाय ठप्प झाल्याने गेल्या दोन वर्षापासून त्याचा जगण्यासाठी संघर्ष सुरू झाला. थकलेलं घराचं भाडं, लाईट बिल, पोटाची खळगी भरण्यासाठी अन्नधान्याचा खर्च करताना त्याला मोठी तारेवरची कसरत करावी लागत होती. त्याने नोकरी शोधण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र, त्याला अपयश आलं. परिस्थिती इतकी वाईट होती की घरचे लाईट बिल भरण्यासाठी देखील सुरजकडे पैसे नव्हते. काही महिन्यांपूर्वी त्याच्या घराचा वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला होता. थकलेलं घरभाडं, वाढत चाललेली उसनवारी आणि त्यात कोसळलेली बेरोजगारीची कुऱ्हाड. यामुळे सुरज नैराश्यात गेला आणि सोमवारी दुपारच्या सुमारास त्याने आपली पत्नी व मुलांना त्यांच्या भावाकडे सोडलं व राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. त्याच्या मागे पत्नी, 13 वर्षांचा मुलगा आणि 7 वर्षांची मुलगी असा परिवार असून त्याच्या जाण्याने आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबाचे भवितव्य आणखीनच काळवंडले आहे.