पालघरमधील तारापूर एमआयडीसीत वायुगळती; तीन कामगारांचा मृत्यू
रासायनिक वायूची तीव्रता एवढी होती की, रुग्णालयातील इतरांनाही त्याचा त्रास जाणवू लागला. कामगारांच्या मृतदेहाची तपासणी करीत असताना डॉक्टरांनाही चक्कर आल्याचंही समोर आलं आहे.
पालघर : तारापूर एमआयडीसीतील एस्क्वायर केमिकल प्लांटमध्ये वायुगळती होऊन तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. केमिकल कंपनीत रासायनिक प्रक्रिया सुरु असताना विषारी वायूची गळती झाल्याने हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एस्क्वायर (esquire) केमिकल कंपनीमध्ये वायुगळती झाल्याने तीन कामगारांना त्रास होऊ लागला होता. त्यानंतर या सर्व कामगारांना औद्योगिक क्षेत्रातील तुंगा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच या कामगारांचा मृत्यू झाला होता. प्रभाकर खडसे (मॅनेजर), दत्तात्रय घुले (ऑपरेटर), रघुनाथ गोराई (कामगार) अशी मृत कामगारांची नावे आहेत.
या रासायनिक वायूची तीव्रता एवढी होती की, रुग्णालयातील इतरांनाही त्याचा त्रास जाणवू लागला. कामगारांच्या मृतदेहाची तपासणी करीत असताना डॉक्टरांनाही चक्कर आल्याचंही समोर आलं आहे. या डॉक्टरवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. मात्र डॉक्टरचे नाव आणि इतर माहिती देण्यास हॉस्पिटल प्रशासनाने नकार दिला आहे.
दुर्घटना घडल्यानंतर चार ते पाच तासानंतर कंपनीचे मालक कामगारांची विचारपूस करण्यास न आल्याने तुंगा रुग्णालयाबाहेर मृत कामगारांच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. काही काळ पोलीस आणि मृतांचे नातेवाईक यांच्यात बाचाबाची सुद्धा झाली.
बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीत अशा प्रकारच्या दुर्घटना वारंवार घडत असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने कामगारांना जीव गमवावे लागत आहेत. मात्र कंपनी मालक यांच्यावर कठोर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा मृतांच्या नातेवाईकांनी घेतला आहे.