वरळीतही आमच्याच पाठिंब्यावर निवडून आलात हे विसरु नका, शेलारांचा शिवसेनेवर टीकेचा बाण
Ashish Shelar on Shiv Sena : येणाऱ्या पालिका निवडणुकीत वरळीच नव्हे तर पूर्ण मुंबईवर भाजपाचे कमळ फुलणार आहे.
Ashish Shelar on Shiv Sena : येणाऱ्या पालिका निवडणुकीत वरळीच नव्हे तर पूर्ण मुंबईवर भाजपाचे कमळ फुलणार आहे. शिवसेना पक्ष हिंदू सणांना विसरला आहे. मराठी माणसांचे सण त्यांनी मागे टाकले आहेत. त्यामुळे वरळी जांभोरी मैदानात त्यांनी साधी परवानगी देखील घेतली नाही. वरळीतच नाहीं तर संपूर्ण मुंबईत भाजपच सत्ता मिळवणार आहे. आमच्याच पाठिंब्यावर वरळीत तुम्ही निवडून आलात विसरू नका, असा टोला आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावलाय. ते मुंबईतील दहीहंडी उत्सवामध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
आज राज्यभरात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. मुंबई, ठाण्यातही राजकीय नेत्यांनी ठिकठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये अनेक गोविंद पथकांनी भाग घेतला आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघ असलेल्या वरळीमध्येही भाजपने दहीहंडीचं आयोजन केले आहे. त्यानंतर वरळी मतदारसंघ भाजप हायजॅक करत असल्याचा वारंवार आरोप केला जात होता. यावर आशिष शेलार यांनी टिपण्णी केली असून शिवसेनेवर टीकास्त्र सोडलेय. शिवसेना पक्ष हिंदू सणांना आणि मराठी माणसाच्या सणाला शिवसेना कधीच विसरली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
आशिष शेलार यांनी शुक्रवारी घाटकोपर येथील राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी हजेरी लावली. भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी यावेळी शिंदे सरकारचं कौतुक केलं. त्याचवेळी त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र करताना मुंबईत भाजपचीच सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केला. आमच्याच पाठिंब्यावर वरळीत देखील निवडून आलात विसरू नका, असा इशाराही यावेळी त्यांनी दिलाय.
शेलार म्हणाले की, 'एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे धन्यवाद! कारण त्यांनी निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे आपण पाहतोय सर्वत्र उत्साह आहे. सर्व सण साजरे केले जात आहेत. आज घाटकोपर येथे राम कदम यांनी उत्तम दहीहंडीचे आयोजन केले आहे. ' शिवसेनेनं हिंदुत्व कधीचं सोडलं आहे. मराठी माणसांचे सण त्यांनी मागे टाकले. त्यामुळे वरळी जांभोरी मैदानात त्यांनी साधी परवानगी देखील घेतली नाही. वरळीतच नाही तर संपूर्ण मुंबईत भाजपच सत्ता मिळवणार आहे. आमच्याच पाठिंब्यावर वरळीत देखील निवडून आलात विसरू नका, असेही शेलार म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि तरुणाईच्या तुफान जल्लोषात वरळीच्या ऐतिहासिक जांबोरी मैदानात मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार संपवण्याचा संकल्प करणारी दहिहंडी मुंबई भाजपातर्फे फोडण्यात आली. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी उत्सवात विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार राजहंस सिंह, उत्तर भारतीय महाराष्ट्र अध्यक्ष संजय पांडे, संजय उपाध्याय आयोजक संतोष पांडे आदी सहभागी झाले होते.