Dadar Kabutar Khana: 'पोलिसांनी मला मारहाण केलेय, मराठी माणसाचं रक्त काढलं'; मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांना पोलिसांनी पकडलं
Dadar Kabutar Khana: गोवर्धन देशमुख येताच पोलिसांनी गराडा घातला, झडप टाकून पकडण्याचा प्रयत्न, पण मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते पेटून उठले. दादर कबुतरखान्याबाहेर राडा.

Dadar Kabutar Khana: दादर कबुतरखान्याबाहेर 6 ऑगस्टला जैन समाजाने आंदोलन करुन पोलिसांशी बाचाबाची केली आणि चाकू-सुऱ्यांनी ताडपत्री फाडून काढली तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले नाहीत? मग आता मराठी माणूस शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करत असताना त्यांना का पकडता, असा सवाल मराठी एकीकरण समितीच्या (Marathi Ekikaran Samiti) कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. शस्त्रं काढण्याची भाषा करुनही जैनधर्मीयांवर (Jain Community) कोणतीही कारवाई केली जात नाही. एरवी देवेंद्र फडणवीस कोणत्याही विषयावर बोलतात. मग याप्रकरणावर का बोलत नाहीत. 6 ऑगस्टला पोलिसांनी एकाही जैन धर्मीयावर कारवाई केली नाही. पोलिसांनी मारहाण केलेय मला, माझं रक्त काढलंय. तुम्ही मराठी माणसाचं रक्त काढलंय, 6 ऑगस्टला तुम्ही कुठे होतात, असा सवाल मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी गोवर्धन देशमुख यांनी केला.
मराठी एकीकरण समितीने कबुतरखान्याच्या बाहेर आज आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. काल रात्रीच पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या होत्या. मात्र, यानंतरही आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते दादर कबुतरखान्याच्या परिसरात येऊन धडकले. मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी गोवर्धन देशमुखही याठिकाणी आले. त्यांनी पोलिसांना भेटून निवेदन देण्याची मागणी केली. मात्र, गोवर्धन देशमुख यांनी दादर कबुतरखान्याच्या परिसरात पाऊल ठेवताच पोलिसांच्या एका तुकडीने त्यांना गराडा घातला आणि त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावं एवढंच मागणी आहे. आणीबाणीचा काळ आणू नका, असे गोवर्धन देशमुख यांनी म्हटले. यावेळी मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. अखेर पोलिसांनी गोवर्धन देशमुख यांना ताब्यात घेऊन गाडीत टाकले. यानंतर मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
पोलिसांनी आज सकाळपासूनच दादर कबुतरखान्याच्या परिसरात अतिरिक्त कुमक मागवून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. या परिसरातील दुकानंही बंद ठेवण्यात आली होती. मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते याठिकाणी येताच पोलिसांनी त्यांना पकडून गाडीत कोंबायला सुरुवात केली. गोवर्धन देशमुख यांना अवघ्या काही मिनिटांत पोलिसांनी गाडीत टाकून पोलीस ठाण्यात नेले. त्यामुळे पोलिसांनी 6 ऑगस्टला जैनधर्मीयांना सहजपणे आंदोलन करुन दिले, मग मराठी माणसांना तोच न्याय का लावला जात नाही, असा सवाल विचारला जात आहे.
आणखी वाचा
दादरच्या कबुतरखान्याजवळ मराठी आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड; मंगलप्रभात लोढा म्हणाले...























