मुंबईत लॉकडाऊनमध्ये कस्टमचा 90 लाखांचा माल लंपास, 7 आरोपींना अटक
कस्टमच्या या गोडाऊनच्या संरक्षणासाठी सिक्युरिटी गार्डसुद्धा ठेवण्यात आलेला आहे. मात्र तरीसुद्धा या गोडाऊनमध्ये शिरून लॉकडाऊनच्या काळामध्ये सुमारे 90 लाखांचा माल चोरी करण्यात आला.
मुंबई : मुंबईतील शिवडी भागात लॉकडाऊनमध्ये कस्टमच्या गोडाऊनमधून सुमारे 90 लाखांचा माल चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चोरी करणाऱ्या आणि ज्यांच्याकडे माल विकला अशा एकूण सात जणांना शिवडी पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील शिवडी या भागामध्ये निमा वेअरहाऊस आहे. ज्याचा मुंबई कस्टम गोडाऊन म्हणून वापर करते. कस्टमने जप्त केलेले सामान या गोडाऊनमध्ये ठेवला जातो. या गोडाऊनच्या संरक्षणासाठी सिक्युरिटी गार्डसुद्धा ठेवण्यात आलेला आहे. मात्र तरीसुद्धा या गोडाऊनमध्ये शिरून लॉकडाऊनच्या काळामध्ये सुमारे 90 लाखांचा माल चोरी करण्यात आला.
कस्टमचे अधिकारी जेव्हा जेव्हा गोडाऊनमध्ये पाहणी करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात सामान चोरी झालेलं निदर्शनात आलं. त्यानंतर त्यांनी तात्काळ शिवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत शिवडी पोलीस स्टेशनने तात्काळ तपास सुरू केला. चोरी अतिशय शिताफीने केली गेली होती. कुठल्याही प्रकारचा पुरावा पोलिसांच्या हाती लागत नव्हता ज्यामुळे तपास करणे आणि चोरट्यांचा शोध लावणे पोलिसांना अवघड जात होतं.
तरीसुद्धा शिवडी पोलीस स्टेशनचे निरीक्षक गजानन कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस उपनिरीक्षक किरण मांढरे यांच्या हुशारीमुळे परिस्थितीजन्य पुरावे सापडू लागले. ज्याच्यानंतर या गुन्ह्याचा उलगडा होण्यास हळूहळू सुरुवात झाली.
शिवडी पोलिसांनी एकूण सात आरोपी अटक केले असून यामधील तीन आरोपींनी गोडाऊनमध्ये जाऊन कालांतराने चोर्या केल्या होत्या. तर इतर चार जणांकडे हे चोरी केलेलं सामान विकण्यात आलं होतं. पोलिसांनी आतापर्यंत 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.