मुंबईत कोरोनाबाधितांना बेडस् उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष वॉर्ड निहाय वॉर रुमची निर्मिती
कोरोनाग्रस्तांना रुग्णालयांत बेड्स मिळत नसल्यांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून महत्वाची सुधारणा.मुंबईत कोरोनाबाधितांना बेडस् उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष वॉर्ड निहाय वॉर रुमची निर्मिती.
मुंबई : शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी अनेकांना रुग्णालयात खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहे. यावर मुंबईत एक हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आला होता. मात्र, कोरोना रुग्णांना खाटा मिळवून देण्यासाठी सुरु केलेल्या मुख्य नियंत्रण कक्षातील 1916 या हेल्पलाईनबाबत देखील अनेक तक्रारी येत होत्या. रुग्णसंख्या वाढल्यानं या क्रमांकावरचा ताणही वाढला आणि रुग्णांना खाटाही लवकर मिळेनात. यावर उपाय म्हणून रुग्णांना तातडीने आणि विकेंद्रीत पद्धतीने खाटा उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच ‘वॉर्ड वॉर रूम’ कार्यान्वित करण्यात येणार आहे.
यात विकेंद्रित पद्धतीने रुग्णालय खाटा व्यवस्थापन प्रणाली (Decentralized Hospital Bed Management) अंमलात आणली जाणार आहे. त्यासाठी विभाग कार्यालयांच्या पातळीवर वॉर्ड वॉर रूम्स म्हणजे विभागीय नियंत्रण कक्ष लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह सहल यांनी दिले आहेत. वॉर्ड वॉर रुम कार्यान्वित केल्यानंतर त्यांचे संपर्क क्रमांक प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे व इतर संपर्काच्या माध्यमांतून मुंबईकरांपर्यंत पोहोचविले जाणार आहेत.
कशी असेल वॉर्डनिहाय वॉर रुम
- महानगरपालिकेच्या सर्व विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या विभाग कार्यालय स्तरावर हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावयाचा आहे.
- विभाग स्तरावरील ‘वॉर्ड वॉर रूम’ मधून कोरोना बाधित रुग्णांसाठी खाटांचे व्यवस्थापन केले जाणार आहे.
- प्रत्येक ‘वॉर्ड वॉर रूम’ मध्ये दिल्या जाणाऱ्या दूरध्वनी क्रमांकाच्या 30 वाहिन्या असतील.
- 24x7 तत्वावर तीन सत्रांमध्ये अखंडपणे कार्यरत राहणाऱ्या या कक्षांमध्ये वैद्यकीय अधिकारी, आवश्यक इतर कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे.
- दररोज कोरोना बाधित रुग्णांची यादी प्राप्त झाल्यानंतर ‘वॉर्ड वॉर रूम’ मधील डॉक्टर या रुग्णांशी संपर्क साधून, त्यांना असलेल्या बाधेचे स्वरुप समजावून घेऊन रुग्णास कोविड आरोग्य केंद्र किंवा रुग्णालयामध्ये योग्य व आवश्यक खाट मिळवून देण्याची जबाबदारी पार पाडतील.
त्या ठिकाणी रुग्णाला नेण्याबाबतच्या कार्यवाहीमध्ये समन्वय साधला जाईल. तीव्र स्वरुपाची बाधा असल्यास रुग्णाच्या घरी आवश्यक वैद्यकीय साधनांसह जाऊन त्याची तपासणी करणे, त्याआधारे तातडीने खाट उपलब्ध करून देणे, सामुदायिक आरोग्य स्वयंसेवक यांच्या मदतीने या कामामध्ये समन्वय साधणे, रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णालयांमध्ये बाधित व्यक्तीला पोचवणे, ही सर्व कार्यवाही ‘वॉर्ड वॉर रूम’ स्तरावर केली जाणार आहे. उपलब्ध सर्व खाटांची माहिती ऑनलाइन प्रणालीवर ‘वॉर्ड वॉर रूम’ द्वारे अद्ययावत केली जाणार आहे.
महानगरपालिकेच्या किंवा शासकीय रुग्णालयांमध्ये थेट येणाऱ्या बाधित किंवा संशयित रुग्णास योग्य ते उपचार देणे किंवा जवळपासच्या जम्बो फॅसिलिटीमध्ये त्यांना दाखल करणे याबाबतचा निर्णय संबंधित रुग्णालयाचे अधिष्ठाता घेतील. दरम्यान, थेट केंद्रीय नियंत्रण कक्षात खाटांसंदर्भात प्राप्त होणारे दूरध्वनी कॉल ‘वॉर्ड वॉर रूम’कडे वळते करण्याची तरतूद देखील यामध्ये करण्यात आली आहे. तसेच, ज्या व्यक्तिंना मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत किंवा ज्यांच्यात लक्षणे नाहीत अशा बाधितांना (asymptomatic) त्यांचा चाचणी अहवाल आल्यानंतर काही कालावधीनंतर देखील विभागीय स्तरावरुन काही दिवस दूरध्वनीवरुन पाठपुरावा केला जाईल.
Special Report | कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जालन्यात दोन तरुणांनी केलं कॅश डिसइन्फेक्शन मशीन