कल्याणमध्ये टँकरमधील केमिकल अंगावर सांडल्याने दाम्पत्य गंभीर जखमी
वालधुनीहून कल्याण पूर्वेकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या चौकात अचानक त्यांच्या बाजूने जात असलेल्या केमिकल टँकरचं झाकण उडालं आणि टँकरमध्ये असलेलं केमिकल साळसकर दाम्पत्याच्या अंगावर उडालं.
कल्याण : रस्त्यावरून जाणाऱ्या टँकरमधून दाम्पत्याच्या अंगावर केमिकल सांडल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे . या घटनेत दुचाकीवरून जात असलेलं हे दाम्पत्य गंभीर जखमी झालं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहणारे गौरेश आणि गौरी साळसकर हे रविवारी रात्री त्यांचा दीड वर्षाचा मुलगा तनिश याच्यासह शॉपिंग करून परतत होते. यावेळी वालधुनीहून कल्याण पूर्वेकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या चौकात अचानक त्यांच्या बाजूने जात असलेल्या केमिकल टँकरचं झाकण उडालं आणि टँकरमध्ये असलेलं केमिकल साळसकर दाम्पत्याच्या अंगावर उडालं.
यामध्ये पत्नी गौरी यांच्या चेहऱ्याला, हाताला आणि पायाला भाजलं, तर पती गौरेश यांच्या डोळ्यात हे केमिकल उडाल्यानं त्यांना एका डोळ्यानं दिसणं बंद झालं. सुदैवानं त्यांचा मुलगा तनिश याला यात फारशी इजा झाली नाही. या प्रकारानंतर टँकरचालक तिथून पळून गेला.
घटनस्थळी उपस्थित असेलेल्यांनी साळसकर दाम्पत्याला तातडीनं कल्याण पश्चिमेतील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र गौरेश यांना तेथून मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. तर गौरी यांच्यावर कल्याणच्याच खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेला आता 36 तास उलटून गेले असले, तरी अजूनही निष्काळजी टँकर चालकाला पोलीस पकडू शकलेले नसल्यानं नाराजी व्यक्त होत आहे.