(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CoronaVirus | पालघर जिल्ह्यातील शाळा 5 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत बंद
पालघर जिल्ह्यातील सर्व शासकीय, खासगी शाळा, जिल्हा परिषदेचा शाळा, सर्व अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रम शाळा, निवासी शाळा, कोचिंग क्लासेस 5 एप्रिल पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.
पालघर : पालघर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तसेच यापूर्वी विविध शाळांमध्ये आजाराचे झालेले संक्रमण लक्षात घेऊन, वसई- विरार महानगरपालिका क्षेत्र वगळून जिल्ह्यातील सर्व शाळा 5 एप्रिल पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी जारी केले आहेत.
शासनाने पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू ठेवण्याबाबत मान्यता देताना संबंधित शाळेतील शिक्षकांनी स्वतःची राहण्याची व्यवस्था ते ज्या गावात शाळेवर नियुक्ती आहेत, तेथे करण्याचे निर्देशीत केले होते. तरी देखील अनेक शिक्षक बाहेर गावाहून ये- जा करीत असल्याचे निदर्शनास आले असून, बाधित झाल्याने कोरोनाचा संसर्ग विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या संसर्गामुळे रुग्ण संख्येत वाढ होत असून आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजनेचा भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व शासकीय, खासगी शाळा, जिल्हा परिषदेचा शाळा, सर्व अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रम शाळा, निवासी शाळा, कोचिंग क्लासेस 5 एप्रिल पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.
इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग सुरू ठेवणे शाळा व्यवस्थापन यांना ऐच्छिक राहणार असून आजारी विद्यार्थी, शिक्षक, संस्था चालक, कर्मचारी यांना शाळेत प्रवेश राहणार नाही. तसेच आजारी असलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना शाळेत प्रवेश दिला जाईल, याची खबरदारी संबंधित मुख्याध्यापकांनी घ्यावी असे देखील या आदेशात सूचित केले आहे.
संबंधित बातम्या :