(Source: ECI/ABP News/ABP Majha)
coronavirus | ठाण्याच्या नवीन आयुक्तांचे बैठकसत्र, एकाच दिवशी घेतले अनेक निर्णय
संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी घाबरून न जाता भाजीपाला मार्केट, औषध दुकाने, धान्य दुकाने येथे गर्दी न करता सोशल डिस्टन्स ठेवण्याचे आवाहन महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी सर्व ठाणेकर नागरिकांना केले आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी घाबरून न जाता भाजीपाला मार्केट, औषध दुकाने, धान्य दुकाने येथे गर्दी न करता सोशल डिस्टन्स ठेवण्याचे आवाहन महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी सर्व ठाणेकर नागरिकांना केले आहे. दरम्यान, जीवनावश्यक वस्तूंचा साठा कमी पडणार नसून बिग बझार, डी मार्टच्या माध्यमातून सोसायट्यांना धान्य पोहोचविण्याबाबत प्रशासन विचार करीत असल्याने याबाबत नागरिकांनी घाबरून जावू नये असे आवाहनही सिंघल यांनी केले आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आज महापालिका आयुक्त सिंघल यांनी आज वरिष्ठ अधिका-यांची बैठक घेवून परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी सर्वप्रथम महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय, आरोग्य केंद्रे, गर्दीची ठिकाणे, भाजीपाला मार्केट सोडियम हायपोक्लाराईटसने निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश दिले. त्यानंतर फुटपाथ आणि फुटपाथला लागून असलेले रस्ते निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना दिल्या.
सद्यस्थितीत भाजीपाला मार्केटस, धान्य दुकाने, मेडिकल स्टोअर्स या ठिकाणी नागरिकांनी पुरेसे अंतर न ठेवता मोठ्या प्रमाणात रांगा लावल्याचे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर सिंघल यांनी परिमंडळ उपायुक्त यांनी त्यांच्या प्रभाग समितीमधील सहाय्यक आयुक्तांमार्फत भाजीपाला विक्रेत्यांमध्ये किमान 10 फुटाचे अंतर ठेवण्यास सांगावे तसेच जे विक्रेते या सूचना पाळणार नाहीत त्यांच्यावर पोलिसांच्या साहाय्याने कारवाई करण्याच्या सूचना श्री. सिंघल यांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाबाबत तातडीच्या मदतीसाठी महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाशी टोल फ्री -1800 222 108 तसेच हेल्प लाईन-022 25371010 यावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
शहरात येणा-या प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग होणार
ठाणे शहरामध्ये येणाऱ्या मुख्य आणि इतर अशा विविध 12 प्रवेशद्वारांवर प्रत्येकाचे थर्मल स्कॅनरद्वारे स्कॅनिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले.
भाजी विक्रेत्यांमध्ये 10 फुटाचे अंतर
शहराच्या विविध भागामध्ये भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी आपापसांत किमान 10 फुटांचे अंतर ठेवण्याच्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी असे सांगून परिमंडळ उपायुक्त यांनी सहाय्यक आयुक्तांच्या माध्यमातून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. जे भाजी विक्रेते या सूचनांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
भायंदरपाडा येथे विलगीकरण कक्ष
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी महापालिकेच्यावतीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय येथे 8 बेडचा विलगीकरण कक्ष निर्माण करण्यात आला आहे. कल्याणफाटा येथील टाटा हाऊसिंगच्या रेंटल इमारतीमध्येही विलगीकरण कक्ष निर्माण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याचप्रमाणे एमएमआरडीएच्या अखत्यारीतील भायंदरपाडा येथील लोढा कॅाम्प्लोक्समध्ये रेंटल अंतर्गत प्राप्त झालेल्या सी विंगमधील 780 सदनिका उपलब्ध करून देण्याबाबत एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव यांनी देणाचे मान्य केले आहे. त्यामुळे भायंदरपाडा येथे नवीन विलगीकरण कक्ष तातडीने सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
India Lockdown | ठाण्याच्या भाजी मंडईत कमी गर्दी; पोलीस आणि प्रशासनाच्या उपाययोजनांना यश