Coronavirus : मुंबईत पाच पेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱ्या सोसायट्यांमध्ये मायक्रो कंटेनमेंट झोन; नियम न पाळल्यास 10 हजारांचा दंड
मुंबईतील पाचपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळणाऱ्या सोसायट्या आता मायक्रो कंटेनमेंट म्हणून घोषित करण्यात येणार आहेत. त्यामुळे अशा सोसायट्यांनी कोरोनाचे नियम धाब्यावर धरल्यास 10 हजार रुपये आणि दुसऱ्यांदा नियम न पाळल्यास 20 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
![Coronavirus : मुंबईत पाच पेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱ्या सोसायट्यांमध्ये मायक्रो कंटेनमेंट झोन; नियम न पाळल्यास 10 हजारांचा दंड Coronavirus Micro containment zones in societies with more than five patients Rules announced by BMC Coronavirus : मुंबईत पाच पेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱ्या सोसायट्यांमध्ये मायक्रो कंटेनमेंट झोन; नियम न पाळल्यास 10 हजारांचा दंड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/06/1ffdccc0426b20b6ec8f7ea1389dc954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिकेनं कंबर कसली आहे. महानगर पालिकेनं अनेक निर्बंधांसोबतच नियमावलीही तयार केली आहे. महानगरपालिकेनं लागू केलेले नियम न पाळल्यास 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच महापालिकेकडूनही नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे.
मुंबईतील पाचपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळणाऱ्या सोसायट्या आता मायक्रो कंटेनमेंट म्हणून घोषित करण्यात येणार आहेत. त्यामुळे अशा सोसायट्यांनी कोरोनाचे नियम धाब्यावर धरल्यास 10 हजार रुपये आणि दुसऱ्यांदा नियम न पाळल्यास 20 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. पालिकेने तसे परिपत्रक काढून यासंदर्भात आदेश दिले आहेत.
कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने सोमवारपासून कडक निर्बंध जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने नियमाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. यात कोविड नियम मोडणाऱ्या सोसायट्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. एखाद्या सोसायटीत पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास अशी इमारत सील केली जाते. अशा सोसायट्या आता मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात येणार आहेत. सोसायट्यांनी तसा गेटबाहेर फलक लावणे आवश्यक आहे. या सोसायट्यांनी कोविड नियम पाळणं बंधनकारक असून बाहेरील व्यक्तीस सोसायटीत प्रवेश देऊ नये. संबंधित गृहनिर्माण सोसायटीने या सर्वांचे निरीक्षण करून नियमाच्या अंमलबजावणीसाठी जबादारी घ्यावी, असे आदेश पालिकेने दिले आहेत. मात्र सोसायटीने नियमाची अंमलबजावणी न केल्यास सोसायटीला 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. संबंधित सोसायटीने पुन्हा दुर्लक्ष करून नियम मोडल्यास 20 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. पालिकेने तसे आदेश दिले असून त्याबाबत परिपत्रकही जारी केले आहे.
मायक्रो कंटेनमेंट म्हणून घोषित केलेल्या इमारतींसाठी नियमावली :
- इमारतीबाहेर पोलीस तैनात करण्यात येतील.
- बाहेरील व्यक्तीला सोसायटीत प्रवेश बंदी.
- वर्तमान पत्र विक्रेत्यांनी सोसायटीच्या गेटवर वर्तमानपत्र द्यावे.
- जीवनावश्यक वस्तू आदी साहित्यही सोसायटीच्या गेटवर स्विकारावे.
- सोसायटीतील व्यक्तीला कोरोना चाचणी करायची असल्यास त्यांनी लॅबच्या व्यक्तीला घरी बोलवावे.
- कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घराबाहेर पडल्यास एफआयआर दाखल होणार.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)