(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत केंद्रीय पथकाने कोणतंही भाष्य केलं नाही : बीएमसी
विविध माध्यमांमध्ये ज्या प्रकारची अतिरंजित माहिती प्रकाशित झाली आहे, तशा प्रकारचे कोणतेही प्रत्यक्ष वा सूचक वक्तव्य केंद्रीय पथकाने महापालिका आयुक्तांकडे किंवा अतिरिक्त महापालिका आयुक्तांकडे अथवा इतर कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केले नाही.
मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील 'कोरोना कोविड 19' च्या रुग्णांची आकडेवारी ही मे महिन्याच्या मध्यापर्यंत काही लाखांमध्ये पोहोचेल' अशा आशयाच्या बातम्या आज माध्यमातून केंद्रीय पथकाच्या हवाल्याने प्रकाशित झाल्या आहेत. या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेद्वारे स्पष्ट करण्यात येते की, सदर केंद्रीय पथकाने आपल्या अभ्यास दौऱ्यादरम्यान मुंबई महापालिका आयुक्त यांच्यासह महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. मुंबई महापालिका क्षेत्रातील परिस्थिती आणि त्या अनुषंगाने महापालिका करत असलेल्या उपाययोजना याविषयीची माहिती घेतली.
संबंधित केंद्रीय पथकाने महानगरपालिका प्रशासनाद्वारे राबवण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक व वैद्यकीय उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर विविध माध्यमांमध्ये ज्या प्रकारची अतिरंजित माहिती प्रकाशित झाली आहे, तशा प्रकारचे कोणतेही प्रत्यक्ष वा सूचक वक्तव्य केंद्रीय पथकाने महापालिका आयुक्तांकडे किंवा अतिरिक्त महापालिका आयुक्तांकडे अथवा इतर कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केले नाही. याउलट वर उल्लेख केल्यानुसार त्यांनी महापालिकेच्या प्रयत्नांचे सकारात्मकरित्या कौतुकच केले. सर्व बाबी लक्षात घेता, विविध माध्यमातील या बातम्या वस्तुस्थितीचा विपर्यास करणाऱ्या असून अतिरंजित व दिशाभूल करणाऱ्या आहेत.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 'कोरोना कोविड 19' विषयक आकडेवारी लक्षात घेता, 11 मार्च ते 21 मार्च 2020 यादरम्यान मुंबई महापालिका क्षेत्रातील 3 हजार 445 व्यक्तींना या कोरोनाची बाधा झालेली असून यापैकी 425 पेक्षा अधिक रुग्ण आजवर बरे होऊन घरी गेले आहेत. यापैकी बहुतांश रुग्णांवर मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषधोपचार करण्यात आले, ही बाब या ठिकाणी आवर्जून लक्षात घ्यायला हवी. तसेच 2 हजार 882 रुग्ण सध्या महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून यापैकी 80 टक्के पेक्षा अधिक रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना धोका नाही.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आकडेवारी लक्षात घेतल्यास 'कोरोना कोविड 19' या आजाराचा संसर्ग होण्याचे प्रमाण व वाढीचे प्रमाण आटोक्यात आहे. केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार मुंबई महानगरपालिकेद्वारे आवश्यक ती सर्व कार्यवाही काटेकोरपणे अमलात आणली जात आहे. ज्यामुळे संसर्गास प्रतिबंध होण्यास देखील मोठी मदत होत आहे.
सर्व बाबी लक्षात घेता, मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे प्रसारमाध्यमांना नम्र विनंती करण्यात येते की, त्यांनी याप्रकारची अतिरंजित माहिती प्रकाशित करण्याचे लोकहितास्तव टाळावे. त्याचबरोबर नागरिकांनाही आवाहन करण्यात येते की, त्यांनी केंद्र शासन, राज्य शासन व मुंबई महानगरपालिका यांच्याद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना काटेकोरपणे पाळाव्यात आणि 'कोरोना कोविड 19' विरोधात सुरू असलेल्या लढाईला बळ द्यावे.
काय होतं वृत्त?
मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 15 मे पर्यंत तब्बल साडेसहा लाखांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज केंद्रीय आरोग्य पथकाने व्यक्त केल्याचं वृत्त होतं. मात्र या वृत्ताचं मुंबई महापालिकेने खंडन केलं आहे.