मुंबईतील चार ठिकाणं कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट; सर्वाधिक सक्रिय रुग्ण अंधेरीत
मुंबईत आता सर्वाच विभागांमध्ये रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. शनिवारी 9090 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर आता मुंबईत 62 हजार 187 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.
मुंबई : कोरोनाचा संसर्ग मुंबईत झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे दैनंदिन रुग्ण वाढीचा सरासरी दर आता 1.54 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र गोरेगाव, वांद्रे पश्चिम, अंधेरी पूर्व-पश्चिम आणि चेंबूर असे काही विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू लागले आहेत. तर पश्चिम उपनगरात अंधेरी ते बोरिवलीपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून दररोज वाढत आहे. दररोज सरासरी आठ ते नऊ हजार बाधित रुग्णांची नोंद होत आहे. सुरुवातीला चेंबूर, गोवंडी, वांद्रे या काही विभागांमध्ये रुग्ण वाढ दिसून येत होती. मात्र आता सर्वाच विभागांमध्ये रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. शनिवारी 9090 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर आता मुंबईत 62 हजार 187 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.
मुंबईतील रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी कमी होऊन 44 दिवसांवर आला आहे. गोरेगाव विभागात हेच प्रमाण 33 दिवस, वांद्रे पश्चिम येथे 34 दिवस, अंधेरी पूर्व - जोगेश्वरी येथे 37 दिवसांमध्ये, चेंबूर - गोवंडी विभागात 37 दिवस आणि अंधेरी पश्चिम येथे 38 दिवसांमध्ये रुग्ण संख्या दुप्पट होत असल्याचे आढळून आले आहे. दररोज सुमारे 42 ते 45 हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत.
सर्वाधिक सक्रिय रुग्ण
के पश्चिम- अंधेरी पश्चिम - 4849
के पूर्व- अंधेरी पूर्व- जोगेश्वरी- 4171
आर मध्य- 3549
आर दक्षिण- 3484
पी उत्तर- 3423
पाचहून अधिक बाधित रुग्ण आढळल्यावर संपूर्ण इमारत सील करण्यात येते. सील करण्यात आलेल्या सर्वाधिक 167 इमारती अंधेरी पश्चिम या विभागात आहेत. त्यापाठोपाठ परळ विभागात 83, ग्रँट रोड- मलबार हिल येथे 79, चेंबूर - गोवंडी परिसरात 59 आणि भायखळा परिसरात 57 इमारती सील आहेत.