Mumbai Corona Update | मुंबईत कोविड रुग्णसंख्येचा नवा उच्चांक; आज दिवसभरात रुग्णसंख्या 3 हजारांच्या पार
कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मुंबईत आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांचा उच्चांक पाहायला मिळाला आहे. आज दिवसभरात मुंबईत तब्बल 3062 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. दरदिवशी कोरोना रुग्णांचा उच्चांक पाहायला मिळत आहे. मागील वर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मुंबईत आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांचा उच्चांक पाहायला मिळाला आहे. आज दिवसभरात मुंबईत तब्बल 3062 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शहरात आतापर्यंत 3 लाख 55 हजार 897 रुग्ण आढळले आहेत.
मुंबईत फेब्रुवारीच्या मध्यानंतर दिवसेंदिवस आकडेवारी वाढत आहे. बुधवारी (17 मार्च) 2377 रुग्णांची नोंद झाली होती. काल (18 मार्च) ही संख्या तब्बल 500 रुग्णांनी वाढून 2877 वर पोहोचली आहे. ही आकडेवारी आतापर्यंतची सर्वाधिक असल्याची नोंद झाली होती. परंतु आज रुग्णसंख्येने उच्चांक गाठला, एका दिवसातील रुग्णसंख्या तीन हजारांच्या पार पोहोचली. आज 3062 नवे रुग्ण आढळले आहेत.
मुंबईत मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच कोरोना रुग्णांच्या संख्येच झपाट्याने वाढ पाहायला मिळाली. एप्रिल मे, जूननंतर कोरोनाने कहर केला होता. त्यानंतर 7 ऑक्टोबरला ही रुग्णसंख्या 2848 पर्यंत पोहोचली होती. ही आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या होती. मात्र त्यानंतर मुंबई महापालिकेच्या प्रभावी उपाययोजना आणि कठोर अंमलबजावणीमुळे कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली. मग अनलॉक प्रक्रिया टप्प्याटप्प्याने शिथील केल्याने सार्वजनिक ठिकाणी असलेले व्यवहार पुन्हा सुरु झाले. मात्र कोरोनाचा धोका कमी कायम असल्याने कोरोना नियमाचे पालन करणे बंधनकारक होते. मात्र वाढलेली गर्दी आणि लोकांनी कोरोना नियमाचे पालन न केल्याने ही संख्या पुन्हा वाढली आहे.
राज्यभरात 25 हजार 681 नवे कोरोनाबाधित
महाराष्ट्रात मागील 24 तासात 25 हजार 681 नव्या कोरोनाबाधितांचं निदान झालं आहे. तर 70 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. आतापर्यंत एकूण 24 लाख 22 हजार 021 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 21 लाख 89 हजार 965 जण कोरोनातून मुक्त झाले आहे. आतापर्यंत 53 हजार 208 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 1 लाख 77 हजार 560 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत.
लॉकडाऊनचा पर्याय आहे पण... : मुख्यमंत्री
कोरोनाबाधितांची वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, "लॉकडाऊन हा पर्याय आहे, पण मला विश्वास आहे की नागरिक नियमांचं पालन करतील." ते पुढे म्हणाले की, "जेव्हा मागील वर्षी महामारीला सुरुवात झाली तेव्हा कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आपल्याकडे काहीच नव्हतं. पण आता कमीत कमी ढालच्या रुपात लस तर आहे. आता सगळ्यांना लस द्यावी याला प्राधान्य आहे. लसीकरणासाठी लोकांनी पुढे येणं गरजेचं आहे. लसीचे डोस कमी होणार नाहीत असं आश्वासन केंद्र सरकारने दिलं आहे."