कोरोना संशयिताच्या मृतदेहाला नातेवाईकांकडून अंघोळ, 9 नातेवाईकांना कोरोनाची लागण, 70 जण क्वॉरंटाईन
कोरोनासदृश्य लक्षणं असल्यानं डॉक्टरांनी त्याचा मृतदेह नातेवाईकांना द्यायला नकार दिला. त्यावर नातेवाईकांनी कुठलाही नियम न मोडता अंत्यसंस्कार करण्याची लेखी हमी दिली. मात्र नियमांचं उल्लंघन केल्याने नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण : कोरोना संशयिताच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना केलेला हलगर्जीपणा नातेवाईकांना चांगलाच महागात पडल्याचा प्रकार उल्हासनगरात घडला आहे. कारण यामुळे तब्बल 9 नातेवाईकांना कोरोनाची लागण झाली आहे.
उल्हासनगरच्या खन्ना कम्पाऊंड भागात राहणाऱ्या एका व्यक्तीचा 9 मे रोजी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णलयात मृत्यू झाला. मात्र त्याला कोरोनासदृश्य लक्षणं असल्यानं डॉक्टरांनी त्याचा मृतदेह नातेवाईकांना द्यायला नकार दिला. त्यावर नातेवाईकांनी कुठलाही नियम न मोडता अंत्यसंस्कार करण्याची लेखी हमी दिली. त्यामुळे मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला.
मात्र संबंधित रुग्ण हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा ठोस अहवाल नसल्यानं नातेवाईकांनी रुग्णालयाने प्लॅस्टिकमध्ये बांधून दिलेला मृतदेह उघडला आणि त्याला अंघोळ घातली. यावेळी अनेकांचे हात मृतदेहाला लागले. इतकंच नव्हे, तर त्याच्या अंत्यसंस्कारालाही जवळपास 70 जण उपस्थित राहिले. हा प्रकार समजताच उल्हासनगर महापालिकेनं या सर्व 70 जणांना शोधून क्वारंटाईन केलं आणि त्यांची कोरोना चाचणी केली.
महापालिकेने केलेल्या चाचणीत यापैकी 9 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आणखीही काही जणांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. या सगळ्यानंतर उल्हासनगर महापालिकेनं या नातेवाईकांविरोधात कडक भूमिका घेतली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
VIDEO | शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्याचं स्वातंत्र्य, कृषीक्षेत्रासाठी केंद्र सरकारच्या 11 मोठ्या घोषणा