Coronavirus : मानखुर्दमधील बालगृहामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव, 18 मुलांना कोरोनाची लागण
कोरोनाबाधित सर्व मुलांना कोणतीही लक्षणे नसली तरी त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. ही सगळी मुले 14 ते 15 वयोगटातील आहेत.
मुंबई : मानखुर्दमधील चेंबूर चिल्ड्रन्स होम या बालगृहामध्ये पुन्हा एकदा कोरोनाने प्रवेश केला आहे. एकूण 18 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाग्रस्त मुलांना वाशीनाका येथील महापालिकेच्या विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. चिल्ड्रन्स एड सोसायटीअंतर्गत असलेल्या मानखुर्दमधील बालगृहामध्ये मुलांच्या आरोग्याची नियमित तपासणी तसेच निर्जंतुकीकरण करण्यात येते.
मागील महिन्यात रत्नागिरी येथून एका मुलाला आणण्यात आले होते. त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर देखील त्याला गृहविलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. काही दिवसानंतर त्याला दुसऱ्या बालगृहामध्ये हस्तांतरित करण्यात आले होते. तिथे प्रवेश देताना पुन्हा तपासणी करण्यात आली तेव्हा त्याचा अहवाल पॉजिटीव्ह आला होता. या नंतर दोन दिवसांपूर्वी बालगृहातील एका मुलाला सर्दी व एकाला अंगदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तातडीने बालगृहातील 105 मुलांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 18 मुलांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
सर्व मुलांना कोणतीही लक्षणे नसली तरी त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. ही सगळी मुले 14 ते 15 वयोगटातील आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत देखील या बालसुधार गृहात कोरोनाने शिरकाव केला होता आणि आता दुसऱ्यादा इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त मुले आढळल्याने इथली चिंता वाढली आहे.
राज्यात आज 4,666 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात आज 4,666 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 510 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 63 हजार 416 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आज 131 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तब्बल 42 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 52 हजार 844 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,503 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 345 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 345 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 280 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,22,039 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3036 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1611 दिवसांवर गेला आहे.