2022 बीएमसी निवडणुकीसाठी भाजपने केलेली वॉर्ड रचना आणि आरक्षण बदलण्याची काँग्रेसची भूमिका
आगामी 2022 मधील मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप सरकारने केलेली वॉर्ड रचना आणि आरक्षण बदलावं अशी भूमिका काँग्रेसने घेतली असून यासाठी काँग्रेसचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणूक समोर ठेवून काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत 227 जागांवर लढण्याची चाचपणी करण्यात आली. त्याचवेळी 2017 निवडणुकीच्या वेळी झालेली वॉर्ड रचना आणि आरक्षण याबाबत काँग्रेसने आक्षेप नोंदवला. याबाबत काँग्रेसने एक अंतर्गत समिती नेमली होती. या समितीने पक्षाला आपला अहवाल दिला. त्यानंतर आजच्या बैठकीत काँग्रेसने वॉर्ड रचना आणि आरक्षण बद्दलण्याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेसने वॉर्ड रचना आणि आरक्षणाबाबत नेमलेल्या समितीने मांडलेले निष्कर्ष
- तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वॉर्ड रचना आणि अरक्षणमुळे काँग्रेसला 40 जागांवर फटका बसला - भाजपचे नगरसेवक जिंकून येतील अशी वॉर्ड रचना करण्यात आली - वॉर्ड आरक्षण हे 10 वर्ष असावे अशी शिवसेनेची भूमिका आहे, यावर चर्चा झाल्याशिवाय निर्णय होऊ नये
या समितीच्या अहवाल आधारावर 2022मधील मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तत्कालीन भाजप सरकारने केलेली वॉर्ड रचना आणि आरक्षण बदललं जावं ही भूमिका काँग्रेस घेणार आहे. यासाठी काँग्रेस शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. 2017 मधील मुंबई महापलाईक निवडणुकीआधी भाजप सरकारने वॉर्डची रचना आणि आरक्षण बदललं होतं. त्याचा फायदा भाजपला झाला. त्यामुळे 2022 च्या महापालिका निवडणुकीआधी वॉर्ड रचना आणि आरक्षण बदललं जावं याबाबत आज काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाली. या वॉर्ड रचना आणि आरक्षणमुळे समाजातील विविध घटकांना न्याय मिळाला नाही, अशी भूमिका काँग्रेसची आहे. त्यामुळे बीएमसी निवडणुकीआधी वॉर्ड रचना आणि आरक्षण बदलण्याची काँग्रेसची आग्रहाची भूमिका आहे.
227 जागा लढण्याबाबत चाचपणी त्याचप्रमाणे मुंबईतील 227 जागा लढण्याची चाचपणी आज करण्यात आली. 100 दिवस 100 वॉर्ड हा उपक्रम देखील सुरु असून फेब्रुवारी महिन्याअखेरीस 25 ते 30 वॉर्डपर्यंत काँग्रेस पोहोचेल, असं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले.
एकूणच 2022 मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. एकेकाळी मुंबईत काँग्रेसचा महापौर होता, ती काँग्रेस आता महापालिकेत विरोधी पक्षनेते पदावर आहे. पक्ष वाढवण्यासाठी आणि महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी काँग्रेसने कामाला सुरुवात केली आहे.