काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपच्या संपर्कात
याआधी राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही भाजप प्रवेश केला आहे.
मुंबई : काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. येत्या काही दिवसात निंबाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहेत.
फलटणचे असलेल्या रणजितसिंह निंबाळकर यांना भाजपकडून माढ्यातून उमेदवारी देण्याची हालचाली सुरु झाल्या आहे. मात्र या चर्चा किती खऱ्या ठरणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
राष्ट्रवादीने माढ्यातून भाजपाच्या समर्थनाने सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष झालेल्या संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत घोषणा केली.
याआधी राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सुजय विखे यांना भाजपने अहमदनगरमधून उमेदवारीही जाहीर केली. याशिवाय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही भाजप प्रवेश केला आहे.