Nana Patole : ओबीसी आरक्षणाला देवेंद्र फडणवीसांमुळं ग्रहण लागलं, नाना पटोलेंचा पलटवार
Nana Patole On OBC : ओबीसी राजकीय आरक्षणावरुन राजकारण रंगलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपावर नाना पटोले यांनी पलटवार केला आहे.
Nana Patole On OBC : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी राजकीय आरक्षणावरुन महाविकास आघाडी आणि खासकरुन काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, फडणवीसांनी आमच्यावर आरोप लावला की आमच्या जवळचे डोंगरे ही ओबीसी आरक्षणाच्या विरोधात गेले आहेत. ते खोटं बोलत आहेत. ओबीसी आरक्षणाला ग्रहण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमुळे लागलं आहे, असं पटोलेंनी म्हटलं आहे.
त्यांनी म्हटलं आहे की, इम्पिरिकल डेटा दिला जात नाही म्हणून अडचण झाली आहे. मोहन भागवत यांनी आरक्षणाशिवाय भारत पाहिजे अशी अनेकदा घोषणा केली. आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काल मुख्य न्यायमुर्ती यांची भेट घेतली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
फोन टॅपिंगसंदर्भात काय म्हणाले नाना पटोले...
फोन टॅपिंगसंदर्भात बोलताना त्यांनी सांगितलं की, डीपीसी लेव्हलच्या अधिकाऱ्यांनी माझे जबाब घेतले. माझा आवाज आहे का याची ही विचारणा केली. राजकीय दृष्ट्या हे फोन टॅपिंग केले आहेत. माझा कुठला व्यवसाय नाही. कुणाच्या अंतर्गत जीवनात असं करता येत नाही. रश्मी शुक्ला यांनी कोणाच्या सांगण्यावरून हे केल हे महत्वाचं होतं. शासकीय निवासस्थानी राहण्यासंदर्भात ते म्हणाले की, बंगला खाली करायला मला सांगितलेलं नाही. रावसाहेब दानवेही शासकीय बंगल्यात राहायचे,असंही ते म्हणाले.
काय म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस
भाजपच्या ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारणीमध्ये बोलताना फडणवीस म्हणाले होते की, महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची कत्तल केलीय. 2010 साली 50 टक्के आरक्षण देता येणार नाही आणि ट्रिपल टेस्ट केल्याशिवाय आरक्षण देता येत नाही असं सांगितलेलं. त्यावेळी कॉंग्रेसचे सरकार होते. कोर्टात जाणारे कोण आहेत तर एक काँग्रेस आमदारांचा मुलगा तर दुसरा नाना पटोले यांचा कार्यकर्ता आहे. कोर्टात कोण गेलं तर काँग्रेसवाले गेले. पण आम्ही सजग होतो आणि आम्ही तात्काळ केंद्र सरकारकडून जनगणनेचा डेटा मागितला. रातोरात आम्ही अध्यादेश काढला, असं त्यांनी सांगितलं. काँग्रेसकडून ओबीसींचा वापर हा दिखाऊपणापुरताच केला गेला आहे, असा आरोपही त्यांनी केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या