मुंबई महापालिकेत सत्ताधारी विरुद्ध आयुक्त सामना; शिवसेनेचं अंतर्गत गटातटाचं राजकारणही उघड
मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर किशोरी पेडणेकर आपल्याच दालनाबाहेर जमिनीवर ठिय्या देऊन बसल्या आणि 25 वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या महापौरांनी चक्क जमिनीवर बसून प्रशासनावरचा राग व्यक्त केला.
मुंबई : आज मुंबई महापालिका मुख्यालयाची इमारत ही आयुक्त विरुद्ध महापौर विरुद्ध सेनेतली गटबाजी अशा तिहेरी सामन्याचा आखाडा बनली. या सामन्यात प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेत चांगलीच खडाजंगीही झाली आणि नंतर शिवसेनेतील अंतर्गत मतभेदही चव्हाट्यावर आले. गेली 25 वर्षे सेनेचा भगवा कायम असलेली मुंबई महापालिका सेनेसाठीच कुस्तीचा आखाडा ठरली.
आज मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर किशोरी पेडणेकर आपल्याच दालनाबाहेर जमिनीवर ठिय्या देऊन बसल्या आणि 25 वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या महापौरांनी चक्क जमिनीवर बसून प्रशासनावरचा राग व्यक्त केला.
महापौर किशोरी पेडणेकर आपल्या महापालिकेतील अधिका-यांवर चांगल्याच भडकल्या कारण होतं. ते आजच्या महत्वपूर्ण प्रभाग समिती निवडणुकीच्या कामकाजासाठी महापौर, नगरसेवक उपस्थित झाले असतांनाही प्रशासनातला एकही व्यक्ती वेळेत हजर नव्हता बरं फोन करावा तर खुद्द महापौरांचे फोनही फोन अधिकारी उचलेनात. शेवटी महापौर संतापून आपल्याच दालनाबाहेर ठिय्या आंदोलनाला बसल्या.
"अधिकारी आमचे फोन उचलत नव्हते, वेळेवर एकही अधिकारी हजर नव्हते आमच्या पदाची प्रतिष्ठा ठेवली गेली नाही म्हणून नगरसेवकांसह ठिय्या आंदोलन केले" असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
महापौरांना असं त्यांच्याच दालनाबाहेर जमिनीवर बसलेलं बघून सेनेच्या सभागृह नेत्यांनी अधिका-यांची तक्रार करण्यासाठी आयुक्त इकबालसिंह चहलांना फोन लावले. अधिकारी सत्ताधा-यांचं नाही तर किमान आयुक्तांचं तरी ऐकतील ही त्यांची अपेक्षा पण, घडलं भलतंच आयुक्तांनी सभागृह नेत्यांच्या तक्रारीवर उद्धट उत्तरं देऊन फोन ठेवला.
शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी "आयुक्तांना बोलायची पद्धत नाही स्वता:ला काय समजतात...त्यांना उद्धट उत्तरं द्यायची असतील तर त्यांनी राज्य शासनात परत जावं यांची मुख्ययमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं सांगत आगपाखड केली."सेनेच्या सभागृह नेत्यांना आयुक्तांनी फोनवर उद्धट उत्तरे दिल्यावरुन महापौर, सभागृह नेता विरुद्ध आयुक्त इकबालसिंह चहल असा सामनाच रंगला. आयुक्तांनीच नंतर नरमाईची भूमीका घेत या वादावर पडदा टाकला खरा पण, मिटलेल्या वादात पुन्हा स्थायी समिती अध्ययक्षांनी उडी घेतली आणि वाद पुन्हा चिघळला.
दरम्यान, आयुक्तांनी सभागृह नेत्या विशाखा राऊतांना आणि महापौरांना फोन करुन, "लहान भाऊ समजून माफ करा" असं म्हणत आयुक्तांनी माफी मागितली...तसंच, विशाखा राऊतांनीही "मी मोठी बहिण म्हणून माफ करत वादावर पडदा टाकत आहोत"असं सांगितलं. मात्र, "हा वाद महापौर आणि सभागृह नेत्यांचा वैयक्तिक वाद आहे. त्यांच्या भूमीकेशी शिवसेना पक्षाचा संबंध नाही" असं म्हणत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांनी शिवसेनेचीच अंतर्गत गटबाजी उघड केली.
स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी माध्ययमांसमोर "आयुक्तांना परत पाठवा ही मागणी सेना पक्ष म्हणून कधीच करणार नाही. ती शिवसेनेची भूमीका नाही. महापौरही नगरसेवक म्हणून ठिय्या आंदोलनाला बसल्या महापौर म्हणून नाही. हा वाद म्हणजे त्यांची वैयक्तिक मते त्याच्याशी शिवसेनेचा संबंध नाही" असे स्पष्टीकरण दिले.
महापालिकेतल्या आजच्या खडाजंगीनं राज्यात आणि महापालिकेतही सत्ताधारी असणा-या शिवसनेचा प्रशासनावर नसलेला वचक आणि सेनेचं अंतर्गत गटातटाचं राजकारण या दोन्ही गोष्टी चव्हाट्यावर आणल्या यावर भाजपसह महाविकास आघाडीत सेनेचा पार्टनर असलेल्या कॉंग्रेसनंही चांगलंच तोंडसुख घेतलं. भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, यांनी "महापालिकेतील सत्ताधारी पक्ष विकलांग, महापौर हतबल आणि प्रशासन उद्दाम असल्याची प्रतिक्रीया दिली".
कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी, "सत्ताधा-यांचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही. प्रशासन केवळ मंत्रालयातून येणारे आदेश ऐकत आहे. नगरसेवकांना अधिकारी जुमानत नाही" असे सांगितले. एकंदरीतच आजची ही खडाजंगी महापालिकेतला शिवसेना विरुद्ध प्रशासन हा वाद चव्हाट्यावर आणणारीच ठरलीच ,पण सोबतच 25 वर्षे मुंबई महापालिकेवर झेंडा फडकावणा-या शिवसेनेच्या अंतर्गत गटातटाच्या राजकारणाची पोलखोल करणारीही ठरली.