वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
स्वा. गौरव दिनानिमित्त 'शतजन्म शोधिताना' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार देणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
![वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा CM Eknath Shinde announcement Versova Bandra Sea Link to be named after Swatantraveer Savarkar वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/28/8d4d3fa07a7b2f149033393d9f8cb134168529477662693_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला 'स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे- वर्सोवा सागरी सेतू' असे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. केंद्र सरकारच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्यांना 'स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 140 व्या जयंतीनिमित्त राज्यात 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात सावरकर यांच्या जीवनावर आधारित 'शतजन्म शोधिताना' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्र सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आज प्रथमच साजरी करण्यात आली. त्याचप्रामणे आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती दिनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले, ही अभिमानास्पद बाब आहे. त्या ऐतिहासिक सोहळ्याचे व क्षणांचे साक्षीदार होता आले. लोकशाहीच्या पवित्र मंदिराची, नव्या संसद भवनाची वास्तू स्थापना व लोकार्पण विक्रमी वेळेत झाले आहे, ही अभिमानास्पद बाब आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, स्वातंत्र्यवीरांचे श्रेष्ठत्व, त्याग, बलिदान, देशभक्ती ही सर्वश्रुत आहे. या देशाचे, राज्याचे व मातीचे सुदैव स्वा. सावरकर यांच्यासारखे क्रांतिकारक येथे जन्माला आले. प्रखर देशभक्तीमुळे त्यांची इंग्रजांमध्ये दहशत होती. र्ण सावरकर समजून घेणं अशक्य व अवघड आहे, परंतु त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास हिंदुत्वाचा सुगंध आपल्याला नक्कीच येईल. स्वदेशीचे कट्टर पुरस्कर्ते, महान क्रांतिकारक, सक्रिय समाजसुधारक असे विविधांगाने त्यांची ओळख होती. ते प्रतिभावंत साहित्यिक, कवी होते तसेच अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते आणि भाषिक गुलामगिरी दूर करण्यासाठी इंग्रजीला त्यांनी अनेक पर्यायी शब्द उपलब्ध करून दिले, असे म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वा. सावरकरांना अभिवादन केले.
पालकमंत्री दिपक केसरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करीत त्यांनी स्वातंत्र्याची जाज्वल्य ज्योत पेटविल्याचे सांगितले. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी अमूल्य योगदान दिल्याचे सांगून विविध इंग्रजी शब्दांना त्यांनी मराठी पर्यायी शब्द उपलब्ध करून दिल्याचे ते म्हणाले. मातृभाषेतून शिक्षण या त्यांच्या विचारांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राधान्याने समावेश केल्याचे त्यांनी सांगितले. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सेल्युलर जेलमध्ये मुंबईकरांच्या वतीने आज 'सागरा प्राण तळमळला' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून सावरकरांच्या स्मृती राज्यभर जपल्या जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रधान सचिव विकास खारगे यांनी प्रास्ताविकाद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. पारतंत्र्यात देशाचा निरुत्साही इतिहास लिहिला गेला, तो प्रेरणादायी कसा होता ते सावरकरांनी लिहिले असल्याचा त्यांनी उल्लेख केला. सावरकरांना अनेक उपाध्या मिळाल्या असून लोकांनी त्या उत्स्फूर्तपणे दिल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या जयंतीनिमित्त यावर्षीपासून दरवर्षी 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे सांगून यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध आठ ठिकाणी महानाट्य सादर होत असून इतरही विभागांमार्फत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)