मुंबई : दीपिकाच्या 'छपाक' या आगामी सिनेमाविरोधात दाखल याचिका ही तथ्यहीन असून ती केवळ निर्मात्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या हेतूनंच दाखल करण्यात आली आहे. मुळात सत्यघटनेवर आधारीत कथा असताना त्यावर कुणीही आपला अधिकार सांगूच शकत नाही. त्यामुळे ही याचिका फेटाळून लावावी अशी मागणी सिनेमाच्या निर्मात्या आणि दिग्दर्शक मेघना गुलझार यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या आपल्या प्रतिज्ञापत्रातून केला आहे.
अॅसिड हल्यासारख्या भयानक घटनेतून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवाल यांची कहाणी सांगणाऱ्या दीपिका पादुकोणच्या आगामी छपाक सिनेमाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे. लेखक राकेश भारती यांनी आपली नोंदणीकृत कथा चोरून निर्मात्यांनी हा सिनेमा बनवल्याचा आरोप करत कॉपीराईट कायद्याअंतर्गत हायकोर्टात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती एस. सी. गुप्ते यांच्यापुढे यावर मंगळवारी सुनावणी झाली, बुधवारी याप्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे.
येत्या शुक्रवारी प्रदर्शनासाठी सज्ज असलेला मेघना गुलझार यांचं दिग्दर्शन आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणची मुख्य भूमिका असलेल्या 'छपाक'ची सध्या सर्वत्र चर्चा आहे. मात्र छपाकची मूळ संकल्पना आणि कथा आपली असून त्याबाबतची रितसर नोंदणीही 'इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशन' (इंपा)कडे करण्यात आली आहे. 'ब्लॅक डे' या नावानं फेब्रुवारी 2015 मध्येच ही नोंदणी केली होती, असा दावा राकेश भारती यांनी आपल्या याचिकेत केला आहे. यावर सिनेमा बनविण्यासाठी आपण अनेक कलाकार आणि निर्मात्यांकडे चर्चा केली होती. ज्यामध्ये फॉक्स स्टार स्टुडिओचाही समावेश होता. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे या सिनेमाचं काम होऊ शकतं नाही, असं आपल्याला सांगण्यात आलं. मात्र आता याच पटकथेवर फॉक्स स्टारचा हा सिनेमा येत असल्याचं कळताच धक्का बसला. त्यामुळे कंपनीकडे याबाबत तक्रार केली, मात्र त्यांनी काहीच दाद न दिल्यामुळे हायकोर्टात दाद मागितल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.
Chhapaak | छपाक सिनेमाच्या पार्श्वभूमीवर दीपिकाशी सोनाली कुलकर्णीने साधलेला खास संवाद | ABP Majha
निर्मात्यांनी लेखकांच्या यादीमध्ये आपल्याला श्रेय द्यावे, अन्यथा सिनेमाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणावी, अशी प्रमुख मागणी त्यांनी कोर्टाकडे केली आहे. आवश्यकता वाटल्यास छपाकची पटकथा आणि आपली पटकथा जाणकारांकडून तपासावी, अशीही मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. गेल्या महिन्यात ही याचिका हायकोर्टात दाखल झाली होती. मात्र याचिकाकर्त्यांचा हा दावा कायद्यात बसणारा नसून निव्वळ सवंग प्रसिद्ध आणि कॉपीराईटच्या नावाखाली निर्मात्यांकडून पैसे उकळण्याच्या उद्देशानं ही याचिका दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.