मुंबई : "राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट राजकीय नव्हती तर सदिच्छा भेट होती. पण भविष्यात काहीही घडू शकतं," अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल (7 जानेवारी) मुंबईत गुप्त बैठक झाली. या बैठकीबाबत विचारलं असता, सुधीर मुनगंटीवार यांनीह भविष्यात मनसे-भाजप एकत्र येण्याचे संकेत दिले.


महाराष्ट्र नवनिर्माण सेना भविष्यात भाजपसोबत जाऊ शकते, असं वक्तन मनसेचे दिग्गज नेते बाळा नांदगावकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केलं होतं. त्यानंतर कालच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रभादेवी परिसरातील हॉटेल इंडिया बुल्स स्कायमध्ये बैठक झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याचे बोललं जात आहे. 23 जानेवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अधिवेशन आहे. तत्पूर्वी फडणवीसांसोबत झालेली राज यांची भेट मनसेसोबतच राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरु शकते, असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.


याविषयी एबीपी माझाने सुधीर मुनगंटीवार यांना विचारणा केली. ते म्हणाले की, "राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट राजकीय नाही तर सदिच्छा भेट होती पण भविष्यात काहीही घडू शकतं. कालपर्यंत शिवसेना कॉंग्रेससोबत जाईल असं कोणी म्हटलं तर वेड लागलंय का असं लोक विचारायचे. पण शेवटी ते एकत्र आलेच ना."


गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून भाजपचा मित्रपक्ष असलेली शिवसेना धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत गेल्याने हिंदुत्ववादी पोकळी भरुन काढण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. त्यासाठीच मनसे आता हिंदुत्वाचा विचार करत झेंडा भगवा करुन हिंदुत्त्वाची कास धरण्याच्या प्रयत्नात आहे.


संबंधित बातम्या


मनसे भाजपसोबत जाणार? राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक