पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या मुदतवाढीला हायकोर्टात आव्हान
पोलीस दलात प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले दत्ता पडसलगीकर हे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सेवा निवृत्त झाले होते. तेव्हा त्यांना शासनाने तीन महिन्याची मुदतवाढ दिली.
मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांचा सेवाकाल राज्य सरकारने वाढवला असून त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु ही मुदतवाढ राज्य सरकारने नियमबाह्य पद्धतीने दिली असल्याचा आरोप करत अॅड आर. आर. त्रिपाठी यांनी पडसलगीकर यांच्या मुदतवाढीला हायकोर्टात आव्हान दिले आहे.
याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. पोलीस दलात प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले दत्ता पडसलगीकर हे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सेवा निवृत्त झाले होते. तेव्हा त्यांना शासनाने तीन महिन्याची मुदतवाढ दिली.
नोव्हेंबर अखेरीस ही मुदतवाढ संपल्याने शासनाने त्यांना आणखी तीन महिन्याची मुदतवाढ दिली. आता नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राज्य सरकारने पडसलगीकर यांना पुन्हा मुदतवाढ दिली असून ते फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होणार आहेत.
मात्र राज्यसरकारने पक्षपातीपणा करत पडसलगीकर यांना मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ रद्द करण्यात यावी तसेच मुदतवाढ देण्याचा निर्णय देणाऱ्यांची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.