Central Railway: मध्य रेल्वेनं कमावलं भंगार विक्रीतून 250 कोटी रुपये, आतापर्यंतची सर्वाधिक महसूल कमाई
Indian Railway : मध्य रेल्वेने सर्व स्थानके, विभाग, डेपो, कार्यशाळा, शेड, सर्व विभाग भंगारमुक्त करण्यासाठी “झिरो स्क्रॅप मिशन” सुरू केलं आहे.
मुंबई : चालू आर्थिक वर्ष 2022-23 (एप्रिल ते ऑक्टोबर) दरम्यान, मध्य रेल्वेने (Central Railway) भंगार विक्रीतून 250.49 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत मध्य रेल्वेला प्राप्त झालेल्या 248.67 कोटींच्या महसूलाच्या तुलनेत ही किंमत 1.82 कोटी रुपयांनी अधिक आहेत.
मध्य रेल्वेला (Central Railway) कोणत्याही वर्षातील एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीतील भंगाराच्या विक्रीतून मिळालेला हा सर्वाधिक महसूल आहे. याबाबत माहिती सांगताना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, "भंगाराची विल्हेवाट लावल्याने केवळ महसूलच मिळते असे नाही, तर परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासही मदत होते आहे. मध्य रेल्वे मिशन मोडमध्ये निवडलेल्या सर्व भंगार साहित्याची रेल्वेमधील विविध ठिकाणी विक्री करणार आहे."
मध्य रेल्वेने सर्व स्थानके, विभाग, डेपो, कार्यशाळा, शेड, सर्व विभाग भंगारमुक्त करण्यासाठी “झिरो स्क्रॅप मिशन” सुरू केलं आहे. याचा हेतू साध्य करण्यासाठी आपले अथक प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
मध्य रेल्वेची तिकीट कमाईतून 193 कोटींची कमाई
मध्य रेल्वेने एप्रिल-ऑक्टोबर या सात महिन्यात तिकीट तपासणीतून 193.62 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे 7 तिकीट तपासणी कर्मचार्यांनी प्रत्येकी 90 लाखांपेक्षा जास्त वसूली केली आहे. विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणी करते. विनातिकीट प्रवास आणि अशा इतर अनियमिततेमुळे होणाऱ्या महसुलावर वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
एप्रिल-ऑक्टोबर 2022 दरम्यान, विनातिकीट प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाची एकूण 29.03 लाख प्रकरणे आढळून आली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत 16.16 लाख प्रकरणे होती, ज्यामध्ये 79.46% ची वाढ दिसून येत आहे.
अशा विनातिकीट प्रवासातून मिळालेला महसूल एप्रिल-ऑक्टोबर 2022 या कालावधीत 193.62 कोटी नोंदवला गेला, तर गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 93.29 कोटींची नोंद झाली होती, त्यात 107.54% ची वाढ झाली आहे. ऑक्टोबर २०२२ या महिन्यात, विनातिकीट प्रवासाच्या व बुक न केलेल्या सामानासह 4.44 लाख प्रकरणांद्वारे मध्य रेल्वेने 30.35 कोटींचा महसूल नोंदवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :