पाच तासानंतर समीर वानखेडे यांची आजची CBI चौकशी संपली, आर्यन खान प्रकरण आणि बेहिशोबी मालमत्ता यावर प्रश्नांची सरबत्ती
Aryan Khan Case: आर्यन खान केस आणि बेहिशेबी मालमत्ता यासंबंधी आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांची सीबीआयने चौकशी केली.
मुंबई: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात 25 कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप असलेल्या आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांची आजची चौकशी संपली आहे. तब्बल पाच तासांच्या सीबीआय चौकशीनंतर उद्या पुन्हा त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. आर्यन खान प्रकरण आणि बेहिशोबी मालमत्ता यासंबंधी सीबीआयने आर्यन खान यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे.
समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी दिल्लीतून देखील सीबीआयची टीम दाखल झाली आहे. वानखेडेंची प्रॉपर्टी, महागड्या गाड्या आणि परदेश वाऱ्यांवरील खर्च यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती आहे. आर्यन खान केसमधील वादग्रस्त घडामोडी, 50 लाख रुपये कथितरित्या स्वीकारल्याचा आरोप, ज्ञानेश्वर सिंह यांच्याशी वादग्रस्त संवाद आणि खुद्द NCBच्या SITनं सादर केलेला अहवाल या सगळ्यांवरून वानखेडेंवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात येतेय. आर्यन खानला सोडवण्यासाठी शाहरुख खानकडे 25 कोटी रुपये मागितल्याचा वानखेडे यांच्यावर आरोप आहे.
दरम्यान, आर्यन खानची चौकशी आणि अटके दरम्यानच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केली होती का, याचाही तपास समीर वानखेडेंच्या चौकशीत सीबीआय करणार आहे. कारण 2 ऑक्टोबर 2021 रोजी आर्यन खानला अटक झाल्यानंतर त्या दिवसाचं सीसीटीव्ही फुटेजच उपलब्ध नाहीये. 25 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीचं एसआयटी पथक मुंबई एनसीबी कार्यालयात पोहोचलं होतं. आर्यन खान प्रकरणाचा तपास कसा करण्यात आला, हे जाणून घेण्यासाठी एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज मागवलं. मात्र सीसीटीव्ही आणि त्याचा डीव्हीआर करप्ट झाल्याचं त्यांना सांगण्यात आलं. सीसीटीव्हीची वायर उंदरानं कुरतडली, असं कारण एनसीबी कार्यालयाकडून देण्यात आलं. पण या कारणावर सीबीआयचा विश्वास नाही. त्यामुळे, सीसीटीव्ही फुटेज गहाळ कसं झालं, याचाही तपास सीबीआय करणार आहे.