(Source: Poll of Polls)
Bhiwandi Building Collaps: भिवंडी दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल; मालक इंद्रपाल पाटील पोलिसांच्या ताब्यात
Bhiwandi Building Collaps: भिवंडी दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीचा मालक इंद्रपाल पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Bhiwandi Building Collaps: भिवंडीतल्या (Bhiwandi) वळपाडा परिसरात 3 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 22 जणांपैकी 14 जणांना बाहेर काढण्यात आलं असून अजूनही बचावकार्य सुरुच आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसंच मुख्यमंत्री शिंदेंनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे. इमारत दुर्घटनेप्रकरणी मालक इंद्रपाल पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
नारपोली पोलिसांनी इमारत बांधणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 304 (2), 337, 338 आणि 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंद्रपाल पाटील असं ताब्यात घेतलेल्या इमारतीच्या मालकाचं नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांनी 2014 मध्ये ही इमारत बांधली असून बहुतांश खोल्या दुकानदार आणि रहिवाशांना भाड्यानं देण्यात आल्या होत्या.
दुर्घटनाग्रस्त इमारतीत तळ मजला आणि पहिल्या मजल्यावर एका कंपनीचं गोडाऊन होतं, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर रहिवासी खोल्या बनविण्यात आल्या होत्या. ज्यात भाडेतत्वावर नागरिक राहत होते. इमारतीवरील दोन मजले हे रहिवासी वापरासाठी होते. ज्यात 27 ते 30 खोल्या बनविण्यात आल्या होत्या. धक्कादायक म्हणजे, या कमकुवत इमारतीवर मोबाईल टॉवर उभारण्यात आला होता. ज्यामुळे इमारतीवर अतिरिक्त भार पडला होता. इमारतीच्या बांधकामात सुरक्षेची कोणतीही बाब बांधकाम विकासकानं लक्षात घेतलेली नसल्यानं ही इमारत कोसळल्याचं बोललं जात आहे.
मुख्यमंत्र्यांनीही दिली भेट
वळपाडा येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री अकरा वाजता भेट दिली. यावेळी बचाव पथकाच्या कामाची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. इमारतीच्या ढिगार्याखाली अडकलेल्या नागरिकांना जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बचाव पथकाला दिल्या. त्याचबरोबर मृतांचा नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत राज्य शासनाकडून करण्यात येणार असून जखमींच्या उपचाराचा खर्च देखील राज्य शासनाच्या वतीने करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
भिवंडीत अनधिकृत व धोकादायक तसे अती धोकादायक इमारतींचा प्रश्न वारंवार समोर येत असतो,त्यातच इमारत दुर्घटना घडल्याच्या देखील अनेक घटना भिवंडीत घडल्या असून या दुर्घटना रोखण्यासाठी भिवंडीत क्लस्टर योजना राबविणे गरजेचे आहे असे मत यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.भिवंडीतील अति धोकादायक इमारतींचा लवकरात लवकर सर्वे करून अति धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह भिवंडी मनपा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांना यावेळी दिल्या.