Lockdown Violation: लॉकडाऊनच उल्लंघन केल्याप्रकरणी टायगर, दिशा पटानी विरोधात गुन्हा दाखल, मुंबई पोलिसांचे मजेशीर ट्वीट
कोविड 19 नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी दिशा पटानी, टायगर श्रॉफ आणि इतरांविरूद्ध वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी ट्वीट करत विनाकारण घराबाहेर पडून 'हिरोपंती' दाखवू नये, असा इशारा दिलाय.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी अनेकदा आपल्या रिलेशनशीपमुळे चर्चेत असतात. दोघांना बर्याचदा एकत्र स्पॉट केले आहे. अलीकडेच ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आलीय. मुंबई पोलिसांनी या दोघांची थांबवून चौकशी केली. दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ मंगळवारी संध्याकाळी जिममधून परत येत होते. यादरम्यान दोघे मुंबईच्या वांद्रे येथे असलेल्या बँडस्टँडला फेरफटका मारत होते. अचानक मुंबई पोलिस तिथे पोहचली आणि त्यांनी त्यांची गाडी थांबविली. या कारवाईनंतर मुंबई पोलिसांनी मजेशीट ट्विट करत इतरांना इशारा दिलाय.
कोविड 19 नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी दिशा आणि टायगरसह इतर काही लोकांविरूद्ध वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की मुंबईत दुपार दोननंतर विनाकारण बाहेर फिरण्यास बंदी आहे. तरीही टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी वांद्रे बसस्थानकाजवळ फिरताना आढळले. यासंदर्भात माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यानंतर मुंबई पोलिसांनी एक मजेशीर ट्विट केलंय, यात दोघांची नावं न घेता त्यांनी केलेल्या चित्रपटांची नावे वापरत इतरांना इशारा दिलाय. मुंबई पोलिसांनी लिहिलंय, की देश कोरोनाशी युद्ध (WAR) लढत आहे, अशा परिस्थितीत रस्त्यावर 'मलंग' करत असलेल्या दोन सेलीब्रिटींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व मुंबईकरांना विनंती आहे की रस्त्यावर विनाकारण 'हिरोपंती' दाखवू नये.
टायगर-दिशाची पोलिसांकडून चौकशी
वृत्तानुसार दिशा कारच्या पुढच्या सीटवर बसली होती आणि टायगर मागील सीटवर होता. यादरम्यान त्यांना मुंबई पोलिसांनी रस्त्यावर रोखले. मात्र, पोलिसांनी चौकशी करून उर्वरित औपचारिकता पूर्ण केल्यानंतर दोघांनाही सोडण्यात आले.
विशेष म्हणजे कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यावेळी लोकांना विनाकारण घराबाहेर पडल्यास कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात येत्या 15 जूनपर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध असणार आहेत. हे निर्बंध हळूहळू कमी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलीय.