Param Bir Singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन रद्द होणार?
Parambir Singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन रद्द होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे.
Param Bir Singh : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे आणि अँटिलिया स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील संशयित आणि जवळपास 5 वसुलीच्या प्रकरणांमध्ये आरोपी असलेली परमबीर सिंह यांचं निलंबन रद्द होऊ शकतं? असं बोललं जात आहे.
एकापाठोपाठ करण्यात आलेल्या गंभीर आरोपांनंतर परमबीर सिंह काही दिवस ड्युटीवर गैरहजर होते. महाराष्ट्र सरकारनं त्यांना डिसेंबर 2021 मध्ये ऑल इंडिया सर्विसेस रुल्स अॅक्ट 1969 अंतर्गत निलंबित केलं होतं. परमबीर यांचं निलंबन करुन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. अशातच सरकारनं त्यांच्या निलंबनाचं कारण उघड करण्यासाठी अद्याप चौकशीसाठी चौकशी अधिकारी नेमलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, भारतातील कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला निलंबित केल्यानंतर त्या राज्याच्या सरकारनं चौकशी अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून 6 महिन्यांत अहवाल द्यावा लागतो.
गृहविभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जनरल अॅडमिस्ट्रेशन विभागानं सेवानिवृत्त ब्युरोक्रेटची यादी चौकशीसाठी गृह विभागाकडे पाठवली होती, मात्र गृह विभागानं तो प्रस्ताव फेटाळून लावला. तसेच जर सरकारनं चौकशी अधिकारी नेमून निलंबनाच्या कारणाचा अहवाल तयार केला नाही, तर त्यांना सिंह यांचं निलंबन मागे घ्यावं लागू शकतं, असं सूत्रांनी सांगितलं आहे. सिंह हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते या वर्षी 30 जून रोजी निवृत्त होत आहेत.
परमबीर सिंह यांच्या विरोधात 5 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी गोरेगाव पोलीस ठाण्यात वसुलीचा गुन्हा दाखल असून त्याचा तपास आता मुंबई गुन्हे शाखेकडून केला जात आहे. या प्रकरणात त्यांचा जबाब नोंदवण्यात आला असून आरोपपत्रही दाखल करण्यात आलं आहे.
काही महत्त्वाचे मुद्दे :
- ठाण्यातील ठाणे नगर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या वसुली प्रकरणातही परमबीर सिंहांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
- ठाण्यातील कोपरी पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या वसुली प्रकरणाचा तपास CID करत आहे. यामध्ये परमबीर सिंहाचा जबाब अद्याप नोंदवण्यात आलेला नाही.
- मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या वसुलीच्या गुन्ह्याचा तपास CID करत असून, या प्रकरणी त्यांचा जबाब अद्याप नोंदवले गेलेले नाही.
- ठाण्यातील बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या अॅट्रॉसिटी गुन्ह्याचा तपास CID कडे असून, याप्रकरणी सिंह यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
- यापूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी ED ला दिलेल्या वक्तव्यात सिंह यांना अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचं सांगितलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Antilia Case : सचिन वाझे यांना तुरुंगात विवस्त्र करून शिवीगाळ केली जाते; परमबीर सिंह यांचा गंभीर आरोप
- Sanjay Raut : परमबीर सिंह मुख्यमंत्र्यांचे नाव घेत असतील तर घेऊ द्या, त्याचा उपयोग होणार नाही : संजय राऊत
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा