मुंबईचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांची जीवाची बाजी! ऊर्जामंत्री नितीन राऊतांकडून सलाम
वीज मंडळातील कर्मचाऱ्यांना किती जीव धोक्यात घालून काम करावं लागतं याचा एक व्हिडीओ उर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेअर केला आहे.वीज कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ पाहुन तुमच्याही अंगावर शहारे येतील.
मुंबई : कितीही संकट आली तरी न थांबणारी मुंबापुरी 12 ऑक्टोबरला सोमवारी सकाळी अचानकपणे वीज पुरवठा खंडित झाल्याने तब्बल अडीच तास ठप्प झाली होती. बत्ती गुल झाल्यानंतर सर्वांनी वीज पुरवठा करणाऱ्यांकडे बोटं दाखवली. मात्र, मुंबईला अखंडीत वीजपुरवठा करण्यासाठी कर्मचारी किती मेहनत घेतात याची खूप कमी लोकांना माहिती असेल. वीज मंडळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बऱ्याचवेळी जीव धोक्यात घालून काम करावं लागतं. याचं उत्तम उदाहरण सांगणारा व्हिडीओ ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्वत: ट्वीट केला आहे.
मुंबईला अखंड वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांपैकी एका वाहिनीमध्ये अडथळा निर्माण झाला होता. हा अडथळा दूर करण्यासाठी महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून वीजपुरवठा सुरळीत केला आहे. हे काम किती धोक्याचं आणि जोखमीचं असतं हे या व्हिडीओमधून आपल्याला पाहायला मिळू शकतं. हा व्हिडीओ उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ट्वीट करून कॅप्शनमध्ये या कर्मचाऱ्याला सलाम असं म्हटलं आहे. उर्जामंत्र्यांचा हा व्हिडीओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
काय आहे ट्वीट? मुंबईला अखंडीत वीज पुरवठा करणाऱ्या चार मुख्य वाहिन्यांपैकी एक असलेल्या कळवा-तळेगाव या वीज वाहीणीचा तुटलेला कंडक्टर दुरूस्त करण्यासाठी महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी लोणावळ्याच्या दुर्गम व अतिखोल भागात वादळ आणि वाऱ्यात जीवावर उदार होऊन काम पूर्ण केले. त्याबद्दल सलाम!!
मुंबईला अखंडीत वीज पुरवठा करणा-या चार मुख्य वाहिण्यापैकी एक असलेल्या कळवा- तळेगाव या वीज वाहीणीचा तुटलेला कंडक्टर दुरूस्त करण्यासाठी महापारेषण च्या कर्मचा-यांनी लोणावळ्याच्या दुर्गम व अतिखोल भागात वादळ आणि वा-यात जीवावर उदार होऊन काम पूर्ण केले. त्याबद्दल सलाम !! pic.twitter.com/LqUhhAhBf3
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) October 17, 2020
तब्बल अडीच तास मुंबई अंधारात मुंबई आणि एमएमआर रिजनमधील वीज पुरवठा खंडित झाल्याचा सर्वात मोठा फटका लोकल सेवा, रुग्णालयांना बसला. अनेक प्रवासी ट्रेनमध्येच अडकले. तर रुग्णालयात कोविड रुग्ण असल्याने वीज पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचं आव्हान होतं. परंतु हा तांत्रिक बिघाड मोठा असल्याने तो दुरुस्त करण्यासाठी सुमारे दोन तास लागले.
तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे? महापारेषणच्या कळवा- पडघा GIS केंद्रात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे, कल्याण, पालघर आणि नवी मुंबईमधील वीज खंडित झाली. याचा cascade effect मुळे मुंबई आणि मुंबई उपनगरातील वीज देखील खंडित झाली, अशी माहिती महावितरणने दिली.
Mumbai Power Cut | मुंबई, ठाण्यातील वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता : नितीन राऊत