(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shiv sena vs BJP : मुंबई महानगर पालिका सभागृहात राडा, भाजप-शिवसेना नगरसेवक भिडले
Shiv sena vs BJP : नायर हॉस्पिटलमध्ये उपचाराअभावी चार महिन्यांच्या बाळाचा काही दिवसांपूर्वी मृत्यु झाला होता. यावरुन भाजप नगरसेवकांनी आरोग्य समितीचा राजिनामा दिला.
Brihan Mumbai Mahanagar Palika : मुंबई महानगर पालिका सभागृत शुक्रवारी राडा झाला. शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) नगरसेवक आमनेसामने आले होते. सभागृहात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला होता, शिवसेनेकडूनही त्यांना प्रत्युत्तर देण्यात आलं. भाजप नगरसेवकांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना यावेळी घेरलं. नायर हॉस्पिटलमध्ये उपचाराअभावी चार महिन्यांच्या बाळाचा काही दिवसांपूर्वी मृत्यु झाला होता. हे बाळ त्याच्या परिवारासहित वरळीतील सिलेंडर ब्लास्ट घटनेत जखमी झाले होते. यावरुन भाजप नगरसेवकांनी आरोग्य समितीचा राजिनामा दिला. यावर बोलताना शिवसेनेच्या यशवंत जाधव यांनी भाजपचे लोक राजिनामा देतात आम्ही शिवसेनेचे मात्र लढतो, असे वक्तव्य केले. यावरुन भाजप नगरसेवक चिडले आणि सेना-भाजप चे नगरसेवक आमनेसामने आले. यावेळी मोठा गदारळ झाला.
अण्णाभाऊ साठे सभागृहाबाहेर भाजप-सेना नगरसेवकांमध्ये तुफान राडा झाला. भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे आणि स्थायी समिती सभापती यशवंत जाधव यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केलेत. भाजप नेता बोलत असतानाच शिवसेनेकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. यावेळी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून घोषणा देण्यात आल्या. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी घटनेचा निषेध करतो कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिलेत असे म्हणताना मात्र भाजपवाले यामध्ये राजकारण करतंय. सोबतच भाजपचे लोक राजीनामा देतात आम्ही मात्र लढतो असे वक्तव्य केलं. यावरुन भाजप नगरसेवक चिडले आणि सेना-भाजप सभागृहात आणि सभागृहाबाहेर थेट रस्त्यावरच आमने-सामने आले.
वरळीतील गणपतराव जाधव मार्गावरील कामगार वसाहतीत बीडीडी चाळीतील एका खोलीमध्ये मंगळवारी 30 नोव्हेंबर रोजी सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये चार महिने वय असलेल्या एका तान्ह्या बाळासह पाच वर्षे वयाचा मुलगा, एक महिला आणि एक पुरुष असे चौघे जण भाजले होते. या चारही रुग्णांना नायर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान, चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. नायर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व दुर्लक्षामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. यावरुन भाजपकडून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. याला शिवसेनेही प्रत्युत्तर दिलं.
मुंबई महापालिका आरोग्य यंत्रणेवर दरवर्षी 4500 कोटी रुपये खर्च करते. त्यानंतरही अशा घटना घडतात ही बाब अत्यंत वेदनादायी, चिंताजनक, निंदनीय व शरमेची असून मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनाला भूषणावह नसल्याची टीका भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी यावेळी केली. दरम्यान, सभा तहकूब करताना शिवसेना आणि भाजप आमनेसामने आले होते. यावेळी भाजपकडून सभा तहकूब करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी शिवसेनेकडून सभागृहाच्या नेत्या विशाखा राऊत यांनी झटपट सभा तहकुबी मांडली. या सभा तहकुबीवर साधक-बाधक चर्चा होऊन ती एकमताने मंजूर झाली आणि सभागृह कोणतेही कामकाज न करता पूर्ण दिवसासाठी तहकूब करण्यात आले.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live