मुंबई उच्च न्यायालयाचे निकाल आता मराठीतूनही उपलब्ध
Bombay High Court : हायकोर्टाच्या अधिकृत वेबसाईटवर 'निवडक निर्णय' या पर्यायात सेवेला सुरूवात

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाचे निकाल आता मराठीतूनही उपलब्ध होणार आहेत. बुधवारपासून हायकोर्टानं आपल्या वेबााईटवर निकाल मराठीतूनही अपलोड करण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी हायकोर्टाच्या अधिकृत वेबसाईटवर एक स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिथं नागरीकांना हायकोर्टानं दिलेले निकाल मराठीतूनही वाचता येतील. मात्र सध्या हा पर्याय काही ठराविक निकालांकरताच उपलब्ध असल्यानं तो 'निवडक निर्णय' या शिर्षकाखाली तयार करण्यात आला आहे. बाकी हायकोर्टाचे सर्व निकाल हे नेहमीप्रमाणे इंग्रजी भाषेत उपलब्ध असतील. सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या मातृभाषेतून निकाल समजणं सोप्प जाईल हा उद्देश आहे.
पहिल्या दिवशी यात 20 फेब्रुवारी रोजी न्यायमूर्ती धीरज सिंह ठाकूर आणि न्यायमूर्ती कमला खाता, न्यायमूर्ती धीरज सिंह ठाकूर आणि न्यायमूर्ती अभय अहुजा आणि न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठानं दिलेले नुकतेच निकाल मराठीतून उपलब्ध करण्यात आले आहेत. या निकालांवर खासकरून लिहिण्यात आलंय, की मराठीतील या निकालांचा वापर मर्यादीत स्वरूपाचा असून नागरिकांना त्यांच्या मातृभाषेत निकाल हे त्यांना ते योग्यरितीनं समजावेत यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी 25 जानेवारी ही न्यायालयांशी निगडीत या नव्या सेवेचं लोकार्पण केलं होतं. ज्यातनं सर्वोच्च न्यायालयातील निकालही देशातील विविध स्थानिक भाषांत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सेवेतून सध्यातरी 2 हजार 900 विविध हे मराठीसह अन्य भारतीय भाषांतून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
इंग्रजीत असलेले सर्वोच्च न्यायालयाचे निकाल 99.9 टक्के लोकांना समजत नाहीत : सरन्यायाधीश
देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हिंदी आणि इतर भारतीय भाषांमध्ये अनुवादित केले जातील, असं सांगितलं होतं. सरन्यायाधीशांच्या या घोषणेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वागत केले. तर सर्वोच्च न्यायालयाचे निकाल इंग्रजीत आहेत आणि 99.9 टक्के लोकांना ते समजू शकत नाहीत, असं सरन्यायाधीश चंद्रचूड काही दिवसांपूर्वीच म्हणाले होते.
निकालांचे भाषांतर करण्यासाठी समितीची स्थापना
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे भाषांतर करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची घोषणाही सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी केली होती. न्यायमूर्ती अभय ओका यांच्याकडे या समितीचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले होते की ही समिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचे हिंदी तसेच गुजराती, ओरिया आणि तमिळ भाषांमध्ये भाषांतर करण्याबाबत खातरजमा करेल. न्यायालयीन निकालाच्या भाषांतराचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
'या' दहा भाषांमध्ये सुप्रीम कोर्टाचे निकाल
सुप्रीम कोर्टाच्या निकालांचे हिंदी व्यतिरिक्त तमीळ, गुजराती, ओरिया, आसामी, खासी, गारो, पंजाबी, नेपाळी आणि बंगाली यांसारख्या पूर्व आणि पूर्वोत्तर भाषांमध्ये देखील भाषांतर केले जात होतं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येतील अत्यंत जुन्या रामजन्मभूमी वादाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या भाषांतराचं कामही वेगाने सुरु आहे. अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या तत्कालीन मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या विशेष खंडपीठाच्या निर्णयाचे भाषांतरही मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्याचं सूत्रांकडून समजतं.
Before You Go
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ






















