मुंबईच्या रस्त्यावरील एक खड्डा बुजवण्यासाठी 17,693 रुपये खर्च, माहिती अधिकारात उघड
मागील सहा वर्षात 24,146 खड्यांच्या तक्रारी बीएमसीला आल्या होत्या त्यातील 23,888 तक्रारीचा बीएमसीने निवारण केलं असल्याची माहिती आपल्या रिपोर्टमध्ये दिली.
मुंबई : मुंबईत फक्त 414 खड्डे बुजविण्याचं काम बाकी असल्याची माहिती दिल्यानंतर आता एक नवी माहिती यासंदर्भात समोर आली आहे. मुंबई महापालिकेकडून खड्डे बुजविण्यासाठी मिळणाऱ्या बजेटनुसार मागील 6 वर्षापासून माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला एक खड्डा बुजविण्यासाठी महापालिकेने किती खर्च केला? आणि नेमके किती खड्डे बुजविले? याचं उत्तर ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
या माहितीमध्ये एक खड्डा बुजविण्यासाठी मुंबई महापालिका तब्बल 17 हजार 693 रुपये खर्च करत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी समोर आणली आहे. 2013 ते 2019 या सहा वर्षातील खड्यांची संख्या आणि खड्डे बुजवण्यावर झालेला एकूण खर्च माहितीच्या अधिकारात उघड करण्यात आला आहे.
या माहितीनुसार 2017 ते 2018 दरम्यान बीएमसीने एकूण 3981 खड्डे बुजविले त्यासाठी एकूण 7 कोटी 73 लाख 22 रुपये खर्च केले आहे. तर 2018 ते 2019 दरम्यान बीएमसीने एकूण 4898 खड्डे बुजविले यासाठी एकूण 7 कोटी 98 लाख 7 रुपये खर्च झाले. म्हणजे एकूण सरासरी एक खड्डा बुजविण्यासाठी बीएमसीने 17 हजार 693 रुपये खर्च केले आहे.
2013 ते 2019 या 6 वर्षाच्या दरम्यान बीएमसी बजेटमध्ये 175 करोड 51 लाख 86 हजारांची तरतूद खड्डे बुजविण्यासाठी करण्यात आली होती. यामध्ये 113 कोटी 84 लाख 77 हजार रुपये खड्डे बुजविण्यासाठी खर्च करण्यात आले.
मागील सहा वर्षात 24,146 खड्यांच्या तक्रारी बीएमसीला आल्या होत्या त्यातील 23,888 तक्रारीचा बीएमसीने निवारण केलं असल्याची माहिती आपल्या रिपोर्टमध्ये दिली. यानुसार, प्रत्येक वर्षी 90 ते 100 खड्डे बुजविल्याचा दावा महापालिकेने केला असला तरी रस्त्याची स्थिती कोट्यवधी रुपये खर्च करुनही जैसे थे आहे.
बीएमसीने आतापर्यंत फक्त आलेल्या खड्ड्यांच्या तक्रारी आणि त्यासाठी केलेला निवारण इतकीच माहिती दिली. मात्र, त्यासाठी झालेला खर्च आणि मुंबईत एकूण वार्डनुसार खड्ड्यांचा अहवाल हा मागवावा हा सर्वे अद्याप केलेला नाही. त्यामुळे इतका पैसा खर्च करून सुद्धा मुंबईला खड्ड्यात ठेवून भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विरोधी पक्ष आणि आरटीआय कार्यकर्ते यांच्याकडून केला जात आहे.