BMC : कुत्रा पाळण्यासाठी मुंबई महापालिकेकडून अधिकृत परवाना घेणं बंधनकारक, वार्षिक शुल्क भरावं लागणार
Mumbai News : कुत्रा पाळण्यासाठी मुंबई महापालिकेकडून अधिकृत परवाना घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यासाठी वार्षिक शुल्क महापालिकेकडे भरावं लागणार आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीनं "पाळीव व भटक्या कुत्र्यांबाबत, प्राणी खुराक पुरवणारे / काळजी घेणारे, रहिवासी कल्याण संस्था व अपार्टमेंट मालक संघटना, शैक्षणिक संस्था / टेक पार्क / सार्वजनिक संस्था यांच्यासाठी" यांच्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
आता घरात कुत्रा पाळणं थोडं महागात पडणार आहे. कारण मुंबई महापालिकेने कुत्रा पाळणाऱ्यांसाठी नवी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. यानुसार, कुत्रा पाळणाऱ्यांना महापालिकेकडे वार्षिक टॅक्स भरावा लागणार आहे.
मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे की, कुत्रा पाळण्यासाठी प्रत्येक पालकाने पालिकेकडून अधिकृत परवाना घ्यावा लागेल आणि त्यासाठी वार्षिक 100 रुपयांचा टॅक्स भरावा लागेल. महापालिकेच्या या निर्णयामुळे शहरात पाळीव प्राण्यांची नोंद अधिक प्रभावीपणे ठेवता येणार असून, सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्याचाही विचार यामागे आहे.
मुंबई महानगरपालिकेनं सुप्रीम कोर्ट आणि अॅनिमल वेलफेर बोर्ड ऑफ इंडिया निर्देशानुसार "पाळीव व भटक्या कुत्र्यांबाबत, प्राणी खुराक पुरवणारे / काळजी घेणारे, रहिवासी कल्याण संस्था व अपार्टमेंट मालक संघटना, शैक्षणिक संस्था / टेक पार्क / सार्वजनिक संस्था यांच्यासाठी" मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
ज्या नागरिकांना कुत्रा पाळायचा आहे त्यांनी मुंबई महापालिकेकडे नोंदणी करावी लागेल. मुंबई महापालिकेकडून परवाना घ्यावा लागेल. हा परवाना एमएमसी कायदा 1888 च्या नुसार सेक्शन 191 बी अन्वये घ्यावा लागेल. परवान्याशिवाय कुत्रा पाळणं बेकायदेशीर समजलं जाणार आहे.
जे नागरिक कुत्रा पाळणार आहेत त्यांना मुंबई महापालिकेकडून परवान्यासाठी ज्या अटी निश्चित केल्या जातील त्या पाळाव्या लागतील. याशिवाय अॅनिमल वेलफेर बोर्ड ऑफ इंडिया कडून जी परिपत्रकं काढली जातात त्याची पूर्तता करावी लागेल. नागरिकांना त्यांच्याकडे असणाऱ्या श्वानांची संख्या परवाना काढताना कळवावी लागेल.
अपार्टमेंट्स आणि रहिवासी संघटना, हौसिंग सोसायटीसाठी देखील नियम लावण्यात आले असून पाळीव श्वानांवर बंदी घालता येणार नाही. कुत्रा भुंकतो हे नैसर्गिक असल्यानं बंदी घालणं योग्य नसल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.
मुंबई महानगरपालिकेकडून मार्गदर्शक तत्त्वे https://vhd.mcgm.gov.in/ संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहेत. सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे त्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.























