BMC Election 2026: साहेबांनी असं का केलं, तिला तिकीट का दिलं? फायर आजी शाखाप्रमुखासाठी उद्धव ठाकरेंना भिडल्या, म्हणाल्या, 'निष्ठावंतांवर हा अन्याय...'
BMC Election 2026: श्रद्धा जाधवांच्या प्रभाग क्रमांक २०२ मधून शिवसेनेचे स्थानिक शाखाप्रमुख विजय इंदुलकर हे इच्छुक होते. मात्र जाधव यांना अखेरच्या क्षणी एबी फॉर्म देण्यात आला.

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर घडामोडींना वेग आला आहे. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता त्यामुळे सर्वच पक्षाची इच्छुक उमेदवारांमधून निवड करताना दमछाक झाल्याचं दिसून आलं. अशातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून देखील लढण्यासाठी मुंबईत अनेक जण इच्छुक असल्याने उमेदवारांची निवड करताना नेतृत्वाची आणि नेत्यांनाही काहीशी नाराजी ओढवून घ्यावी लागली. अनेक प्रभागांत इच्छुक पदाधिकाऱ्यांना उमेदवारी न दिल्याने ते नाराज झाल्याचे चित्र दिसून आले तर अनेकांना पुन्हा उमेदवारी दिल्याने नवे इच्छुक चेहरेही नाराज झाल्याचे दिसून आले. मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांना आता उमेदवारी देऊ नका, त्यांच्याजागी नव्या चेहऱ्याला संधी द्या, असे प्रभागातील पदाधिकारी सांगत असताना देखील पक्षनेतृत्वाने पुन्हा श्रद्धा जाधव यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करून त्यांना एबी फॉर्म दिल्याने मातोश्रीबाहेर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी संतापून गोंधळ घातला.
मुंबईत प्रभाग क्रमांक २०२ मधून मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिल्याने मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करीत श्रद्धा जाधव यांच्याविरोधात घोषणा दिल्या. ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 'फायर आजी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजींनीही निषेध व्यक्त करत. त्यांना का तिकीट दिलं अशी विचारणा केली.
BMC Election: साहेबांनी असं का केलं? तिला पुन्हा तिकीट का दिलं?
"उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन आम्ही श्रद्धा जाधव यांना उमेदवारी देऊ नका. त्यांच्या तीन चार टर्म झालेल्या आहेत. त्यांच्या ऐवजी शाखाप्रमुख विजय इंदलकर यांना उमेदवारी द्या, असं सांगितलं होतं. तरी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा श्रद्धा जाधव यांनाच उमेदवारी दिली. साहेबांनी असं का केलं? तिलाच पुन्हा तिकीट का दिलं? निष्ठावंतांवर हा अन्याय आहे. किती वेळा तोच तोच उमेदवार देणार?" अशी तीव्र भावना फायर आजींनी व्यक्त केली.
BMC Election: शाखाप्रमुख विजय इंदुलकर इच्छुकामध्ये तयारी केली पण...
श्रद्धा जाधव यांच्या प्रभाग क्रमांक २०२ मधून शिवसेनेचे स्थानिक शाखाप्रमुख विजय इंदुलकर देखील निवडणुकीसाठी इच्छुक होते. गेल्या काही वर्षांपासून ते शाखाप्रमुख म्हणून काम पाहतात. यंदा उमेदवारी देऊन पक्षाने आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केलेली होती. मात्र, पक्षाने पुन्हा एकदा श्रद्धा जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं, फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांना एबी फॉर्म दिला. पक्षाच्या या निर्णयामुळे काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.
BMC Election: नेमकी अधिकृत यादी जाहीर करण्यास उशीर का?
* बंडखोरी टाळण्यासाठी ठाकरेंची सेना आणि शिंदेंच्या सेनेने आधीच एबी फॉर्म देण्यापासून ते उमेदवार निश्चिती करण्यापर्यंत गुप्तता पाळली... जेणेकरून पक्षांमध्ये बंडखोरी होऊ नये
* काही ठिकाणी ठाकरेंची सेना आणि शिंदे यांच्या सेनेने ऐनवेळी उमेदवार बदलल्याची किंवा दुसऱ्या पक्षातील उमेदवार घेतल्याची सुद्धा उदाहरण पाहायला मिळाली
* काही ठिकाणी पक्षात एकाच प्रभागांमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक इच्छुक असल्याने उमेदवारी निश्चित करताना नाराजी नाट्य घडणे हे स्वाभाविक होते त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी काही ठिकाणी उमेदवार निश्चिती करण्यात आली. त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या तासापर्यंत उमेदवार निश्चित करण्याचं काम झालं
* त्यामुळे आपण कोणाकोणाला एबी फॉर्म दिले आणि कोण आपला उमेदवार निश्चित झाला याची यादी करण्यास मोठा विलंब झाल्याचं पाहायला मिळालं
* त्यामुळे उद्या दुपारी तीन वाजता अर्जांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच हे दोन पक्ष उमेदवारांच्या अंतिम अधिकृत याद्या जाहीर करतील अशी माहिती आहे
ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 'फायर आजी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजींनीही निषेध व्यक्त करत. त्यांना का तिकीट दिलं अशी विचारणा केली. #Fireajji #Shivsenaubt #BMC pic.twitter.com/stkOyR1n1C
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) December 31, 2025























